1.
अडगळीच्या कोप-याला मोकळे केले कुणी?
दार तोडुन उंब-याला मोकळे केले कुणी?
दाबलेल्या घुसमटी झाडावरी बसल्या तिच्या,
या मनाच्या पिंज-याला मोकळे केले कुणी?
बंधनापासून झाल्या मोकळ्या गाठी कशा?
सांग राधे! बाव-याला मोकळे केले कुणी?
दाटला दुष्काळ बघुनी पावसाच्या ऐवजी,
या नभाच्या हाद-याला मोकळे केले कुणी?
फक्त क्षणभर काय मी तो गुंतलो वेणीत त्या,
अन सुगंधी आस-याला मोकळे केले कुणी?
2.
या जिवाची सर्व दारे बंद होऊन गेल्यानंतर,
भेटशिल ना श्वास सारे मंद होऊन गेल्यानंतर.
मी उगावा हीच आहे तीव्र इच्छा आभाळाची,
फक्त भीती मेघ हे बेबंद होऊन गेल्यानंतर.
देवकीचा दोष नाही की; यशोदा आई झाली.
ही व्यथा समजेन बघ तू नंद होऊन गेल्यानंतर.
या मनाची रंडकी का रांड होवुन कुंकू पुसते?
का उदासी भेटते आनंद होऊन गेल्यानंतर?
शक्यता आहे जराशी वाचण्याची या जीवाला;
जर तुझे ते ओठही गुलकंद होऊन गेल्यानंतर.
3.
संन्यस्त जोगड्यांचा झोळीत जन्म गेला,
कंटाळली विरक्ती...चोळीत जन्म गेला.
पत्रात फक्त लिहिले, "विसरून जा मला तू!"
त्या दोन वेदनांच्या ओळीत जन्म गेला.
गावाकडे असावी टुमदार झोपडी ती,
शहरात भेटलेल्या बोळीत जन्म गेला.
का लागते मलाही ती भूक रोज देवा?
स्वप्नात पाहिलेल्या पोळीत जन्म गेला.
ती वाट पाहूनी थकली युद्ध थांबण्याची,
म्हणतात त्या पतीचा गोळीत जन्म गेला.
तू पोरगी म्हणोनी जन्मास काय आली,
निष्पाप गोवरीचा होळीत जन्म गेला.
____________________________________
Khup chhan
उत्तर द्याहटवा