1.
ज्यास कोणी यार नाही
तो खरा दिलदार नाही
औषधांच्या दहशतीने
थांबला आजार नाही
दूर केले दुःख ज्याने
जन्मला अवतार नाही
घातकी माणूस आहे
पातकी अवजार नाही
धीट आहे सोसणारा
वेदना अलवार नाही
ह्या जुगारी जीवनाचा
श्वास दावेदार नाही
2.
जन्मालाही नसते ठावे
आल्यानंतर कोठे जावे
गंध कसा घामाचा येतो?
हे झिजणा-यालाच पुसावे
चुंबकीय लावण्य तुझे हे...
लोखंडाचा मी किस व्हावे
भिजून घ्यावे रूजण्यासाठी
फुलण्यासाठी उन्हात न्हावे
दोन घडीचे जगणे-मरणे
कशास इतके हेवे-दावे
3.
घेतो कशास माझी तू जीवना परीक्षा
मी घेतली कधीची मृत्यूकडून दीक्षा
तू एकटाच नाही वाटेकरी श्रमाचा
जाणून घे नरा तू नारीतली तितिक्षा
द्या रास्त भाव आम्हा घामास पेरल्याचा
भंगार योजनांची देता कशास भिक्षा ?
सांगू नको तुझी तू प्रस्तावना सुखाची
भेटून दुःखितांना जाणून घे समीक्षा
हा न्यायदेवतेचा आहे कसा शिरस्ता
करतो गुन्हा कुणी अन् होते कुणास शिक्षा.
__________________________________
छान एकदम मस्त
उत्तर द्याहटवा