1.
नसतेच कधी जग दिसले इतके सुंदर
जर विठ्ठल माझ्या काळजात नसता तर
ही शर्यत काळा'सोबत' चालायाची
पोचेल शेवटी त्याचा पहिला नंबर
वेगळीच इच्छा मनात आहे माझ्या
भाळलोय मी "वेगळ्या" कुण्या इच्छेवर
मुसमुसून मनपाऊस एवढा झरला
पण तुझ्या दयेला फुटला नाही पाझर
राहतोय मी जन्मल्यापासुनी येथे
पण रोज वाटते माझे नाही हे घर
आकाश पांघरू धरा अंथरुण बनवू
स्वप्नांनी भरवू वातावरणाचे थर
2.
आज आहे उभा मी जिथे ती मला वाखरी वाटते
जेथुनी चार कोसांवरी ती तुझी पंढरी लागते
का मला नीज येते अशी की जिला नीज मानू नये
का मला वाटते रात्रभर आत कोणीतरी जागते
ना कळे मी कशी नेमकी ओळ रचतो तुझ्यावर पुन्हा
आणि दुनिया तिच्याहीमधे एक कादंबरी वाचते
त्या तुझ्या खोल गर्तेमधे प्राण झोकून देताक्षणी
वेदनांचा अमल संपतो मन नवी पायरी गाठते
एक सिग्रेट प्यावी तशी आठवण ओढतो मी तुझी
आणि प्रत्येक श्वासातुनी एक जादूगरी वाहते
________________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा