निशब्द देव___पाच गझला



1.

खरी चिंता अशी आहे,
तुझ्यावर प्रेमही आहे.

अखेरी बोलली इतके,
तुझी गाडी कधी आहे? 

दिसेना थेंबभर पाणी,
विदर्भाची नदी आहे.

नसेना प्रेम माझ्यावर,
नसो !ओळख तरी आहे. 

जरा दे लक्ष पोरीवर,
किती ओली उशी आहे.

2.

व्यथेचे लाडके झालोत आपण,
उगाचच चांगले झालोत आपण.

कशाचे दु:ख आता होत नाही,
कसे होतो कसे झालोत आपण? 

पुन्हा आयुष्य हे सुरळीत झाले,
कदाचित कोडगे झालोत आपण. 

कुणाचा फोन गावाहून आला?
म्हणाला... पोरके झालोत आपण.

घरी जाणे विसरलो आजही मी,
उगाचच वेगळे झालोत आपण.

3.

तिच्या म्हणण्याप्रमाणे सर्व झाले शेवटी,
मला हे मान्य,मी तडजोड आहे शेवटी.

तिला मी आवडत नाही असा माझा समज 
तिला मी आवडत होतो,कळाले... शेवटी.

कसा उध्वस्त झालो सर्व शोधत राहिले,
मिळाले प्रेम केल्याचे पुरावे शेवटी.

हवे तेंव्हा हवे तितके मला दे दु:ख,पण
नको विसरूस मी माणूस आहे शेवटी. 

उगाचच तडफडत होतो तिला भेटायला,
तिला भेटून देखिल दु :ख झाले शेवटी.

4.


जिच्या गर्भात रुक्माई दिली नाही,
तिच्या नशिबात तू वारी दिली नाही.

तुझ्यावर प्रेम करतो आजही  कारण
जखम कोणी अशी आधी दिली नाही

मला कळलेच नाही मन कुणाचेही, 
मनाची साथ मग मीही दिली नाही.

क्षमा केली तुला प्रत्येकवेळी मी,
स्वत:ला यामुळे माफी दिली नाही.

कुटुंबाचे नियोजन का असे आई?
मला तू एकही ताई दिली नाही.

सुखांचे काय बोलू सोड जाऊ दे ,
व्यथा सुद्धा मला माझी दिली नाही .

तिला तर खेळता ही येत नव्हते पण 
तिने केंव्हाच आघाडी दिली नाही.

5.

चंद्र चांदण्या सूर्य ग्रहांना अक्षर म्हणतो,
अवकाशाला मी देवाचे दप्तर म्हणतो. 

जखमा माझ्या लिहून घेती कविता गझला 
ह्यासाठी तर मी ठणकेला साक्षर म्हणतो. 

मी गेल्यावर विठ्ठल सुद्धा उभा राहतो,
कुणी कुणाचा किती करावा आदर म्हणतो ? 

इतका गेला आहे तो आधीन भुकेच्या ,
कागदसुद्धा दिसला तर तो भाकर म्हणतो . 

इतकाच फरक आहे  भाषेमध्ये अपुल्या ,
घाम तुम्ही म्हणता अन आम्ही अत्तर म्हणतो. 

किती भाबडा आहे सांगू माझा मुलगा,
हातावरच्या फोडालाही डोंगर म्हणतो.
_________________________________

________________________________________________

३ टिप्पण्या: