1.
जगता जगता रोज नव्याने जळतो आपण
वैरी होऊन स्वत: स्वत:ला छळतो आपण
सावलीसही आस्तित्वाची ओढ नसावी
शर्यतीत या हरलेल्याही पळतो आपण
स्वत:हून जो प्रिय तयाच्या हाती खंजीर
छळवादी या छावणीत मावळतो आपण
सत्याच्या पदरात पडे दुस्वास नेमका
दाहक..वास्तव चटक्यांनी तळमळतो आपण
अनुभूतींची झेप रोज नव शिखरांवरती
मदिरा देते साद तिथे विरघळतो आपण
आपुलकीने आयुष्याला सलाम करतो
ठोकर देते तेच अशी की गळतो आपण
आला गेला जन्म सांगते स्मशान कानी
आत्माविरहीत देहाला मग कळतो आपण
2.
उदासी चेहऱ्यावरची कधी संपायची देवा
फुलांची बाग हाताला कधी लागायची देवा?
ढगाला लाज वाटावी स्वत:च्या वागण्याचीही
अशी शिक्षा कशी केंव्हा तया लाभायची देवा ?
किनारा कोरडा रडतो नदीच्या राहुनी जवळी
नदीला वेदना त्याची कधी उमजायची देवा?
तुला सांगून समजेना मनाचा कोंडमारा जर
कशी हृदयातली भाषा तुला समजायची देवा ?
कसा डोळ्यातुनी साऱ्या पहारा चंद्रभागेचा
सजा ही वाळवंटाची किती भोगायची देवा ?
मनाचा उंबरा माझ्या कधी ओलांडुनी यावे
तुला इच्छा अशी वेडी कधी रे व्हायची देवा?
3.
जसा जन्म आला तसा जाय नक्की
कशाची विठू सांग ही हाय नक्की ?
पिढ्यांनी किती फक्त वारी करावी
कितीदा धरावे तुझे पाय नक्की ?
जराही न येते दया पावसाला
किती आठवावी प्रभो माय नक्की ?
बियाणे हवे रे पुन्हा पेरणीला
विठू सांग आता विकू काय नक्की ?
दिसे सावकारा घरी लेक माझी
कसाईच तो..मागतो गाय नक्की.
जळूदे भले जीव..ना मोल त्याचे
पिकांचा नको रे निरुपाय नक्की
म्हणे देव होता उभा पंढरीला
कुठे गुप्त तो आज झालाय नक्की ?
सुधारून देवा जरा वाग अथवा
तुला लाभणे ना इथे ठाय नक्की.
4.
शेतात पीक नाही..बुजगावणे कशाला
निष्पाप पाखरांना धमकावणे कशाला ?
काळा कभिन्न होतो ढग एक रोज रात्री
हे कोरड्या चुलीला हुलकावणे कशाला ?
शिकलो हजार गोष्टी..परि गोष्ट ही कळेना
आभाळ... देव..याना बोलावणे कशाला ?
गिळतो पिकास ऐसा पिकतो दलाल कोठे
मातीतल्या पिढ्यांना समजावणे कशाला ?
केलीत आत्महत्या तेंव्हाच हात देती
त्यांच्यापुढेच माना डोलावणे कशाला ?
______________________________________
३ री गजल लाजवाब
उत्तर द्याहटवाविकू काय नक्की क्या बात है....
वाह......अभिनंदन.
उत्तर द्याहटवाअभिनंदन ! कौतुकास्पद !!
उत्तर द्याहटवा