
1.
तुला सोडून येतानाच स्वप्ने जाळली होती
पुरावे नष्ट करण्याची शपथ मी पाळली होती
तुला ओलांडणे जमलेच नाही सांजवेळेला,
तुझ्या त्या सावलीपाशी उन्हे रेंगाळली होती
तुझ्या नकळत तुला मी पाहतो हे चूक आहे तर
जरा आठव कितीदा ही नजर तू टाळली होती
किती मोघम किती लाडिक मला समजावले त्यांनी
म्हणे मी चालताना वाट ही ठेचाळली होती
उमललेल्या फुलाच्याही मुळाशी वेदनेचे घर
जरासा देठ खुडता पाकळी किंचाळली होती
तिचे फैलावणारे पंख जेथे छाटले होते
तिथे त्या उंबऱ्याची वेसही ओशाळली होती
दुरावा फारतर दोघांतले अंतर उघड करतो
जवळ होतो तरी मी अंतरे सांभाळली होती
2.
गुन्हा झाला, सजा झाली, तरी डोळ्यावरी येतो
तुझा प्रत्येक ठसका माझिया नावावरी येतो
कसा होकार बहरासारखा अलवारही होतो
गुलाबी होत जातो अन् तुझ्या ओठावरी येतो
उधारी फेड आधीची पुढे मग बोलुया म्हणतो
तरीही रोज का मृत्यू उगा दारावरी येतो
तुझ्याशी गोड बोलावे अशी का आर्जवे त्याची
मुळातच तीळ म्हटले की तुझ्या गालावरी येतो
कुणाच्या मुग्ध श्वासांनी फुले ओशाळली होती
कुणाचा माग काढत गंध हा वाऱ्यावरी येतो
तसा अनयातही दिसतो जरासा कृष्ण राधेला
निळीशी वेदना होतो तरी भाळावरी येतो
3.
जन्मास ये पुन्हा तू, हासून बोहणी कर
शेवट नसेल हाती, सुरुवात देखणी कर
माझ्या मिठीतही तू केलेस राजकारण
झाली बरीच चर्चा, अंमलबजावणी कर
नसलाच चंद्र भाळी, कोरी कशास पाटी?
नशिबात चांदण्यांची हळुवार पेरणी कर
होळीत रंगला ना माझ्यासवे कधी तू
करशील जी दिवाळी अपुल्याच अंगणी कर
प्रत्येक वार होतो पाठीवरीच माझ्या
तू यार मोजताना मागून मोजणी कर
मी पाप पुण्य माझे, मोजून बैसलेलो
चल थेट चित्रगुप्ता, नरकात नोंदणी कर
इतिहास होत नसतो, खरडून पेन शाई
इतिहास घडवण्या तू, देहास लेखणी कर
आहे सुखात मी ही, नाही ददात काही
झाल्या जुनाट गोष्टी; ताजी बतावणी कर
____________________________________