श्याम पारसकर___पाच गझला



1.
     
बरीच देवा युगे उलटली, विटेवरोनी हला विठोबा;
करून शेती मरे बळी तो, बघावयाला चला विठोबा.

वरुणराजा रुसून बसला ,शिवार सुकले मुखाप्रमाणे ;
खरेच ओता वरून पाणी, विचार आहे भला विठोबा.

जमीन भेगाळली अशी की जसे चिरे काळजा पडावे,
कशी अचानक  उभी ठाकली अवर्षणाची बला विठोबा.

गुरा न चारा, पिण्या न पाणी, तहानलेली भकास गावे ;
करी दयेने जमीन ओली, तुझ्याचपाशी कला विठोबा .

बघा बघा हो, करुन गेले खते बियाणे खिसा रिकामा ;
कसा करावा दुबार पेरा,जिवास चिंता मला विठोबा.

तुझेच देवा  खरे भक्त ते ,तुझ्यावरी ती अपार श्रद्धा ,
कधीच त्यांची चुके न वारी,तरी कुठे धावला विठोबा?

जिथे तिथे ती दिसे दुर्दशा,चला अता पंढरीस जाऊ ;
खचून गेल्या असे सावरा, म्हणू नये कोपला विठोबा.

भुकेजल्यांची भणंग दिंडी उभी दिसे ती तुझ्याच दारी,
अशा घडीला जरी न तारी ,म्हणू कसा आपला विठोबा?

जरा दिसू दे ढगाप्रमाणे तुझी छबी सावळी खुलोनी,
निघून ये पावसासवे तू,मधे कुठे थांबला विठोबा?

2.

विठूराया तुझ्यापाया पड़ाया मी निघालो रे,
तुझ्या नामात जादू ही, सुखी आधीच झालो रे.

चला आषाढवारीला बघाया पंढरीराया ;
सुखाची पावली खेळी, कपाळी धूळ ल्यालो रे.

निघालो माउलीसंगे धरोनी बोट ज्ञानाचे,
मुखी वाणी तुकोबाची जसे अमृत प्यालो रे.

कुठे ती बायको पोरे, कुठे शेती,कुठे वाडी;
भरोशावर तुझ्या एका तिथे सोडून आलो रे .

पुढे दिंडया,निघे मागे रथातुन माउली माझी,
सवे भाविक भक्तांच्या सदानंदी बुडालो रे.

करी झेंडे निशाणाचे,मुखी जयकार नामाचा,
अहंता क्रोध ओरडती जळालो रे !जळालो रे !

कुठे फुगडया, कुठे गाणी, कुठेशी भारुडी भजने ;
तिथे मोठेपणा बोले गळालो रे ! गळालो रे !

रथाच्या बैलजोडीला मिळे रे मान देवाचा;
उभ्या त्या रिंगणी घोडयांपुढे नाही पळालो रे.

मनीच्या कामना मेंढया विचरती गोल कळपाने;
बिलगता माउलीचरणी समाधाने निवालो रे .

भरे बाजार नामाचा जिथे दिंडी विसाव्याला ,
हरीच्या कीर्तनामध्ये हरीरंगात न्हालो रे.

कळे त्या टाळ चिपळ्यांना मृदंगाची खडी बोली,
मिळाला सूर वीणेला हरीसंगीत झालो रे.

विठूच्या दर्शनाने ह्या पुरी झाली असे वारी ;
अरे मी तृप्त झालो ना, कुठे नाही म्हणालो रे ?

विठू हृदयात बसवोनी निघू गावाकडे आता,
खिरापत प्रेम वाटाया तुम्हासंगे मिळालो रे.

3.      

दारावरी पहारा ठेवून  पांडुरंगा ,
भक्तास दर्शनाला केला उभा  अडंगा.

तुमचे तुम्हास देतो, अपुले न देत काही,
दाबून सर्व बसला साधू अखेर नंगा.

वैकुंठिच्या तुक्याला माझा निरोप सांगा,
ती तारणार नाही इंद्रायणी अभंगा.

वारीत पालखीला खांद्यावरून नेई,
बारीत दर्शनाच्या कापी खिसा लफंगा.

नियमात ना बसे ते खाणे पिणे तुझे रे,
त्यांच्यासवे विठोबा घेशील काय पंगा?

तीर्थात स्नान करता पापी पवित्र होती,
काढा उपाय काही करण्यास शुद्ध गंगा.

4.

कोण्या रूपे कुणा भेटशी अजून मजला कळले नाही ;
जिथे तिथे तू असशी म्हणती, चिन्ह तसे आढळले नाही.

मुंगी मागे हत्तीचारा तरी म्हणे मज नसे लालसा ;
समाधान थोड्यात मानले ,कसे तुला आकळले नाही ?

योगी,भोगी अथवा रोगी ,एक तरी संतुष्ट दाखवा?
मनात आशा टंच उर्वशी , रूप तिचे मावळले नाही.

तुजला सगळे म्हणती दाता,दुःखाशिवाय काय दिले तू  ?
तसा तेवढा कणवाळू मी, तुझ्या सुखांना छळले नाही.

कधीतरी मी असे ऐकले करुन गुदगुल्या सुखे मारती ;
हसता हसता मरण येतसे, तरी कुणाला वळले नाही.

मला एकदा लाव उराशी म्हणून केल्या लाख प्रार्थना ;
अखेर पटले दगडाचा तू,हृदय तुझे पाघळले नाही!

5.

काल जो व्यायाम केला कोणता तो योग देवा?
भेटला तू एकदाचा...काय योगायोग देवा!

दोर लावूनी गळ्याला तो कसा स्वर्गात आला?
तातडीने नेमला का चौकशी आयोग देवा?

खात बसला योजना पण पोट नाही वाढलेले;
आमच्याही वाटणीला येउ द्या तो रोग देवा!

कर्ज किंवा नापिकीने आत्महत्या सापडेना;
तो विषारी औषधीच्या प्राशनाचा भोग देवा.

राजपाटावर बसाया लागले संन्यासधारी ;
वाटतो घ्यावा अताशा हाच शाही जोग देवा.
_____________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा