मनीष मालुसरे___तीन गझला


1.

दारात आसवांना बांधून बाप माझा
आहे बरीच दुःखे सोसून बाप माझा

आई मरून जाता...तो एकटाच रात्री
रडला ढसाढसा रे बरसून बाप माझा

भरवून लेकरांना,राहून तो उपाशी
झोपून शांत जाई हासून बाप माझा

घामात पावसाच्या शेती भिजून केली
माता जणू भुकेची मानून बाप माझा

बनला नदीवरीचा तो पूल एकतेचा
तुटकीच दोन गावे सांधून बाप माझा

अन्याय जाहल्यावर तो लालबुंद होतो
उठतो नव्या दमाने पेटून बाप माझा

तो जातपात नाही आता मुळीच मानत
झेंडा जुन्या रुढींचा जाळून बाप माझा

मुलगा तशीच मुलगी असती समान दोघे
दुनियेस हात सांगे जोडून बाप माझा

दे घास  तू भुकेल्या,पाणी तहानल्यांना
ही ज्ञान ज्योत आहे लावून बाप माझा

झिजवून श्वास त्याने...फुलवून बाग सारी
तिरडीवरून गेला हरवून बाप माझा

2.

सांगा कुठे कधी मी तितका तयार होतो
या बेगडी जगाचा जहरी नकार होतो

नाही मुळीच मजला भीती पराभवाची
खेळून जीवनाचा आलो जुगार होतो

पाहून शांत मजला ....आले जळून गेले
ठावे न दांभिकांना जळता निखार होतो

मी लावला तयांना त्या सापळ्यात माझ्या
माझ्याच प्राक्तनाचा झालो शिकार होतो

मी भाळलो रुपावर कळलेच सत्य नाही
ओठास ओठ भिडता झालोच ठार होतो

होती तहान मजला केव्हा तुझ्या सुखाची?
दुःखात आसवांना प्यालो चिकार होतो

तू घडवलीस ज्याने दुनिया समानतेची
त्या थोर लेखणीची बघ मीच धार होतो

थोडा प्रकाश देऊ...थोडा सुगंध वाटू
सुचला असा तुम्हाला तो मी विचार होतो

3.

शोधू नका कुणीही मज माणसात आता
मी नांदतो सुखाने वर तारकात आता

सारे दिवे कधीचे विझलेत सज्जनांचे
शोधी प्रकाश थोडा भयभीत रात आता

रानी मनी सुखाचे बहरून शेत येई
नाही असा दिलासा त्या पावसात आता

उच्छाद मांडलेला माझ्याच आसवांनी
केलेय बंद त्यांना मी काळजात आता

गर्दीतल्या सणांनी नेली लुटून अब्रू
झोपून देव गेला त्या उत्सवात आता

मी पेटतो असा की,मी घडवतो पिढ्यांना
बांधून वीज फिरतो मी पावलात आता
________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा