1.
वेळ नाही येत सांगुन वेळ मित्रा;
जीवनाचा हा घडीभर खेळ मित्रा.
वाढले प्रेमाविना त्यांचे कुपोषण;
लेकरांना दे जरासा वेळ मित्रा.
पेरले आहेस जे; उगवेल नक्की;
धीर धर... तू थांब थोडावेळ मित्रा.
वाढली आहे तुझ्या हृदयात भेसळ;
रक्त कोठे राहिले निर्भेळ मित्रा.
सोड आता तू असे धरसोड करणे;
होत आहे जीवनाची भेळ मित्रा.
2.
किती तू बोलताना टाळल्या गोष्टी;
तरी मी वाचल्या डोळ्यातल्या गोष्टी.
तुझी तत्वे तुझे स्टेटस तुझा ईगो;
न जाणे तू किती सांभाळल्या गोष्टी.
दिले हे जीवनाने छान अनुभव पण
किती माझ्या जिवावर बेतल्या गोष्टी.
तुला जर होत आहे त्रास तुटण्याचा;
विनाकारण कशाला ताणल्या गोष्टी.
लपवलेल्या खजीन्या सारख्या जपतो;
मनाच्या मी तळाशी ठेवल्या गोष्टी.
उपाशी लेकराला भाकरी द्याना;
नका सांगू अशा बागेतल्या गोष्टी.
जरा करुया कमी नात्यातली कटुता;
चला लक्षात ठेवू चांगल्या गोष्टी.
______________________________
______________________________
अमोल, आपल्या गझलेतली साफ बयानी आवडली. भट साहेब बाराखडीत म्हणतात "जणू आपण बोलत आहोत, असा शेर असावा". पण हे वाक्य सद्याच्या बहुसंख्य मराठी गझलकारांना समजलेले नाही. तुम्हाला नक्कीच कळले आहे हे तुमच्या या दोन गझलांवरून जाणवतंय.
उत्तर द्याहटवाआशयाच्या दृष्टीने पहिल्या गझलेतले १,३ आणि दुसर्या गझलेतले १,२, ४ सविशेष आवडले. बाकी शेरांमधे अजून चुस्ती येऊ शकते असं वाटलं.
अभिनंदन!
आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे एकाठिकाणी शब्दाच्या नैसर्गिक-उच्चारी वजनाचा सहज उपयोग. लपवलेल्या या शब्दाचे उच्चार ल-पव्-ले-ल्या होतो म्हणून त्याचे वजन लगागागा अशेच घ्यायला हवे. मराठीत त्याचे चक्क गालगागा वजन ही घेतात. तसं घेतल्यास वृत्तबद्ध पठनात लप्-व-ले-ल्या असा कर्णक्टू उच्चार करावा लागेल. अन्य भाषेत असं केलं तर शेर वृत्तात नाही असंच म्हटतील.
उत्तर द्याहटवावृत्तांची उपजत समज असल्यास ही चुक होणार नाही. तुम्हाला ते या उदाहरणात तरी जमलंय असं वाटतं. अभिनंदन
खूप धन्यवाद सरजी तुमची प्रतिक्रिया फार उशिरा वाचली त्याबद्दल खरंच क्षमा असावी... तुमच्या प्रतिक्रियेमुळे मनोबल वाढले आहे . खूप आभार!!!
उत्तर द्याहटवाउपाशी लेकराला भाकरी द्याना
उत्तर द्याहटवाClassच