1.
काळजाला लागलेली आग कविता
पेटलेल्या झोपडयांचा राग कविता
गांडुळांची ही गुलामी षंढ सारी
दंड ठोकी बंड पेरी नाग कविता
भासता लाचार ही वस्तीच सारी
स्वाभिमानी मनगटाची जाग कविता
फार झाले चंद्र तारे गार वारे
राहिली ना जीवनाचा भाग कविता
चालताना वाट ही जुल्मी जगाची
क्रूर काटे सोसनारी बाग कविता
भावनाही शुद्ध करते अंतरीची
अर्भकाचा कोवळा अनुराग कविता
शेवटी देईन दुनिये दान इतुके
तू मला सरणावरीही माग कविता
2.
कुठल्याच संकटाने नाहीच मोडलो मी
होऊन कष्ट माझ्या देहास पावलो मी
येथे पराभवाची कोणी फिकीर केली
संघर्ष पेटलेल्या वस्तीत जन्मलो मी
डिग्री ख-या भुकेची तेथेच घेतली मी
अर्ध्याच भाकरीच्या गर्भात वाढलो मी
आई पिठात पाणी घुसळून देत होती
खोटेच दूध तेव्हा हासून प्यायलो मी
माझ्या मनासा रसिका चिंता तुझ्या ख़ुशीची
रडकेच गीत म्हणुनी हासून गायलो मी
3.
कुणी का न रडले हयातीत माझ्या
अखेरी फुले का वरातीत माझ्या
शवाला जरा खोल माझ्या पुरा रे
तिची याद उतरेल मातीत माझ्या
नसाव्यात जितक्या नभी चांदण्या या
पहाना किती घाव छातीत माझ्या
दिवा अंतरी मी तिच्या तेवणारा
दिसे शेवटी तीच वातीत माझ्या
अरे लेखणी ही खरी जात माझी
मला शोधता काय जातीत माझ्या
कळावे असे कब्र ही आशिकाची
नको रे कमी काय ख्यातीत माझ्या
_____________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा