श्रीराम गिरी___चार गझला



1.

ह्या लेखणीत माझ्या तो भेदभाव नाही;
माझा तसा जगाशी कुठला ठराव नाही.

आहे लढाच माझा ह्या धूर्त लांडग्याशी;
निष्पाप कासवांशी हा बेबनाव नाही.

ह्या संस्कृतीस ताज्या नाहीच तोड कोठे;
सोडून प्रेम येथे बाकी अभाव नाही.

माझेच घाव गेले देऊन शस्त्र हाती;
केला कुणाचसाठी मी हा उठाव नाही.

डोळ्यात क्षोभ नाही,आवाज कुंठलेला;
स्वप्नात भेटलेला हा-तो जमाव नाही.

2.

वादळाशी ह्या तुझी रे गाठ येथे;
शोध काळोखातुनी तू वाट येथे.

घेतले हिसकावुनी तू सौख्य माझे;
लावला ह्या जीवनाला नाट येथे.

गलबताला अभय होते सागराचे;
यामुळे टाळून गेली लाट येथे.

दूर हो संदिग्धते जगण्यातुनी ह्या;
मज नको संत्रस्त वाटाघाट येथे.

झेलुनी मी वार छाती ढाल केली;
राहिली शाबूत म्हणुनी पाठ येथे.

काढुनी डोक्यातला अवघा पराभव;
तू करावे यत्न आटोकाट येथे.

3.

कापले असते मिळूनी सहज अंतर;
सोबतीला घेतले असते मला जर.

यामुळे हा मोगरा दारात माझ्या;
शिंपडूनी शेवटी गेलीस अत्तर.

जे मला सांगायचे नाही कुणाला;
या जगाला पाहिजेही तेच उत्तर.

भोगली प्रत्यक्ष येथे मी कहाणी;
वाटते तुज ऐकताना जी भयंकर.

लटकला निष्पाप तो फासावरी त्या;
सत्य कळले या जगाला फार नंतर.

4.

ती न चिंता आज भाळावर;
टाकला मी भार काळावर.

ते कुठे नशिबी झरे होते;
काढले हे पीक माळावर.

जाणतो बापाविना मीही;
गुजरते त्या काय बाळावर.

विश्व होते प्रेममय अवघे;
नाचताना संत टाळावर.

तुज हवी जर साथ शब्दांची;
लेखणी ही ठेव जाळावर.
_______________________________
____________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा