1.
सावली घेईल ना उचलून मी
सोबती नेऊ कशाला ऊन मी ?
मी तुझा होऊन आता चाललो
पण तुझा राहील का परतून मी ?
फारसा काही फरक पडला कुठे
पाहिले आहे मला बदलून मी
या ऋतुंच्या सारखी होतीस तू
ठेवले नाही तुला बांधून मी
या दिशेला जायचे नाही पुन्हा
ठेवले आहे मला सांगून मी
2.
लुभावणारा गोड हिवाळा
तना मनांची ओढ हिवाळा
तुझ्या मिठीची ऊब मिळेना
करी किती हिरमोड हिवाळा
जर मृत्यूचे ऊन पाहिजे
तू जन्माला जोड हिवाळा
जहर स्वत: जहराला मारी
बर्फामध्ये सोड हिवाळा
डिसेंबराला अंगी भरतो
ऑक्टोबरचा रोड हिवाळा
_____________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा