विशाल ब्रह्मानंद राजगुरु___चार गझला



1.

कधी कोवळे सुख जगू लागतो मी
कधी दुःख नवजात कवटाळतो मी

कधी वाटते मी जरा दूर जावे
कधी अंतरे राखणे टाळतो मी

कसे पैलतीरास गाठावयाचे?
प्रवाहा मधे फार रेंगाळतो मी

जरी वाट सोपी सरळ जीवनाची
तरी अडखळत पावले टाकतो मी

तसा मी न आहे लुळा पांगळा..मग
जगाला निराधार का वाटतो मी?

सुखातच अचानक कधी दुःख दिसते
कधी दुःख सौख्यामधे पाहतो मी

असे काय होते मला हे कळेना
कधी थांबतो अन् कधी चालतो मी

2.

तुझ्या हृदयामधे थोडी मला जागा हवी आहे; 
तुला हे मागणे माझे तसेही वाजवी आहे

पुरा घायाळ मी होतो मला बघतेस तू जेव्हा 
नको समजूस तू इतकी नजर ती लाघवी आहे

मनाचे झाड मोहरते हवा तो फक्त ओलावा 
तुझ्याविण लागली माझ्या मनाला वाळवी आहे

जणू त्या शुष्क वेली सारखा निष्पर्ण होतो मी 
तुझ्या स्पर्शामुळे फुटली अताशा पालवी आहे

जुना झालोय मी आला मला माझाच कंटाळा 
परी इच्छा तशी ताजी तवानी अन् नवी आहे

वहीवर नाव माझ्या पाहिले त्यांनी तुझे तेव्हा 
म्हणाया लागले भलताच हाडाचा कवी आहे

3.

काही चुकून घडते काही घडून चुकते 
ते चूक की बरोबर वेळेनुसार ठरते.

प्रत्येक पुस्तकाला कोळून प्यायलो मी 
वाचून पण कुणाला, व्यवहार ज्ञान कळते?

ठेऊ कसा भरोसा मी फक्त बोलण्यावर? 
जे जे इथे गरजते, ते ते कुठे बरसते?

झाला इथे सुखांचा नुसताच बोलबाला 
हे सौख्य तेच आहे, जे दुःख देत असते.

नाही हुशार इतका , केलेय मान्य मी..पण 
वागायचे कसे ते, तितके मला समजते.

प्रत्येक माणसाची. दुःखे सदा निराळी 
सांगा हरेक व्यक्ती, केव्हा सुखात जगते?

4.

माझ्यावरी न माझी उरली जबाबदारी; 
निष्काळजीपणाची जडली मला बिमारी.

वरदान दौलतीचे आता कुठे मिळावे? 
पुरता कफल्लकीचा झालोय मी पुजारी.

सरणावरीच वाटे सुटतील प्रश्न सारे; 
शोधा जरा गड्यांनो फुकटातल्या वखारी.

दोषी स्वतःच आहे माझ्या परिस्थितीचा; 
नडली असेल बहुधा माझी मला हुशारी.

कर्जामधेच माझे जीवन व्यतीत झाले; 
फेडेन शेवटाला श्वासा तुझी उधारी.
________________________________________

६ टिप्पण्या:

  1. अप्रतिम विशाल. खुप छान.
    बुद्धितेजाला तुझ्या, प्रेमळ विचारांची जोड आहे,
    म्हणूनच तुझा शब्दनशब्द, इतका मधाळ अन गोड आहे. !

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम विशाल. खुप छान.
    बुद्धितेजाला तुझ्या, प्रेमळ विचारांची जोड आहे,
    म्हणूनच तुझा शब्दनशब्द, इतका मधाळ अन गोड आहे. !

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम विशाल. खुप छान.
    बुद्धितेजाला तुझ्या, प्रेमळ विचारांची जोड आहे,
    म्हणूनच तुझा शब्दनशब्द, इतका मधाळ अन गोड आहे. !

    उत्तर द्याहटवा