सतीश दराडे___पाच गझला




1.

मी कुणाला कळायचो नाही
एवढा गूढ  व्हायचो  नाही.

बाष्प होईल फारतर माझे
मी धगीने जळायचो नाही.

वाट वाटेत कालवीन तुझ्या
मी समांतर पळायचो नाही.

घास मिळवायचे धडे देइल
घास तोंडात द्यायचो नाही.

पांग आहे तुझ्या जिवाचा मी
याच जन्मी फिटायचो नाही.

जन्म होताच बोललो होतो
मी इथेही टिकायचो नाही.

2.

मला मातीमध्ये गाडा वरी लोटून पाचोळा
तरी माझ्या वसंताचा ऋतू घेतील धांडोळा.

तुला तोडून देतो जांभळे स्वप्नामधे रात्री
सकाळी मग दिसू लागे उगवता सूर्य गाभोळा.

तुझ्या रेशीम केसांना अताशा वर्ख चांदीचा
तरी माझ्या कवीतेला तुझे वय वाटते सोळा.

हिच्या डोळ्यांवरी काळी दिसे का नेहमी चिंधी
कुणी या न्यायदेवीचा असावा फोडला डोळा.

पुन्हा मातीतुनी काही निघाली कोवळी चित्रे
पुन्हा चित्रांवरी फिरला ढगाचा कोरडा बोळा.

3.

चार अश्रुंच्या सरींनी  वाहुनी   गेलीस  तू
कोरडा होतो व्यथे मी कोडगी होतीस तू

बापजाद्यांनी छताला चंद्रमा टांगुन दिला
काढ वंशाच्या दिव्या हे चांदणे विक्रीस तू.

फक्त तू चुंबन कपाळाचे न माझ्या घेतले
घेतले ठेवून माझे भाग्यही ओलीस तू

जन्म गंगेच्या किनारी तीर्थ हुंगू लागला
यायचो दारी तुझ्या तेव्हा कुठे होतीस तू

भाव मृत्यूचा कराया वेळ नाही राहिला
जीवनाशी एवढी केलीस घासाघीस तू

ताल या जन्मांतराने चुकविला माझा तुझा
एक होती सम जिथे रेंगाळली नाहीस तू.

4.

ज्याच्या छायेखाली असते करवत
त्या झाडाचा खोपा नाही  बघवत.

स्पष्ट   दिसावी   राखेची  रांगोळी
म्हणून बसलो आहे मसण सारवत.

ढग म्हणतो पळवीन तोंडचे पाणी
आणि बियाणे म्हणते नाही उगवत.

आहेत   स्वतःचे  बागाइत    डोळे
मी म्हणून हिंडू का अश्रू उडवत.

चार फुलांनी सजवुन दिला चितेला
देह जणू अनाथ लेकीचा रुखवत.

5.

कोणत्या सांदीत  मळ आहे किती
या  मनाचे  क्षेत्रफळ  आहे   किती.

नजर काळी व्हायच्या आधी पहा
कोणता माथा  उजळ आहे  किती.

हात  हाती  घालुनी  चालुन  बघू
चाल कोणाची  सरळ आहे किती.

चार   पोटे   माझिया   हातावरी
मी जिता असणे अटळ आहे किती.

चांदण्याचा  कौल  देहाला  तुझ्या
चेह-याला  चंद्रबळ  आहे   किती!
_______________________________


_______________________________________

३ टिप्पण्या: