सचिन क्षीरसागर___तीन गझला



1.

युगयुगांचा त्रास हा गेला टिपेला वाटतो 
विठ्ठलाचा भार आता या विटेला वाटतो 

पाहिली अोलावताना मी चितेची पापणी
आज बहुदा सद्गुणी माणूस मेला वाटतो

लटकतो खोपा कुठे हिरवा,कुठे भगवा,निळा
पाखरांनी आज जातीवाद केला वाटतो

वीज कडकडली मघाशी हुंदक्यागत वाटली
कंठ आभाळा तुझाही दाटलेला वाटतो

पोट गेलेले खपाटी अन् नजर व्याकूळली
जीवना तू जन्म जन्माचा भुकेला वाटतो

वावराचा बघ किती दिसतोय सुतकी चेहरा
पावसाचा काल बहुदा जीव गेला वाटतो

2.

ओसाड शेत बघुनी काळीज फाटलेले
डोळयात रे बळीच्या आभाळ दाटलेले

फसतात चेह-याला दिसते कुठे कुणाला
डोहात काळजाच्या हे दु:ख साठलेले

तारूण्य ह्या पिकांचे ते नासवून गेले
येथील पावसाळे होते पिसाटलेले

भेगाळली मनाची ही भिंत कैकवेळा
पाहूनिया कळ्यांना गर्भात छाटलेले

गळफास घेतल्यावर ते सांत्वनास आले
त्यांनीच काल होते अनुदान लाटलेले

3.

असा ठेव विश्वास तू ताकदीवर
जगाने झुकावे तुझ्या ठोकरीवर 

तुला विठ्ठला पूजले मी मनातुन 
तरी जीव गेला तुझ्या पायरीवर 

तुला काय मिळते पिकवतो जरी तू
नसे हक्क साधा तुझा भाकरीवर

सुखाने तिथे नांदती राम-अल्ला
नको व्यर्थ चर्चा करू बाबरीवर

सुखासोबती मांड दुःखासही तू 
उधळतिल फुले लोक मग शायरीवर

नको व्यर्थ अभिमान या जीवनाचा
असे जायचे शेवटी गोवरीवर
______________________________

1 टिप्पणी: