शुभानन चिंचकर___ तीन गझला




1.

व्हायचे, होऊन गेले... राहुदे
चौकशीपुरतेच नाते राहुदे

होत जाते काळजालाही सवय
आज तर दुखणार थोडे... राहुदे 

सोडला मी हक्क, सारे घे तुला 
दुःख पण माझ्याच नावे राहुदे

कोंडमारा फार नाही चांगला
कोंडल्या श्वासात गाणे राहुदे

झोप तर नशिबासदेखिल लागते
मात्र कायम स्वप्न जागे राहुदे

काय मग उरणार जगण्याची मजा
एक आयुष्यात कोडे राहुदे

भाव बाजारात जर मिळवायचा
जीवनाचे फूल ताजे राहुदे 

चंद्र ताऱ्यांची गिरवतो अक्षरे
तेवढे आकाश काळे राहुदे

2.

धुंद हा पाऊस आणिक मोगरा गंधाळलेला
मंद गाणी संगतीला अन चहा वाफाळलेला

जीव केवळ घ्यायचा हा ठेवला होतास बाकी
न्हाउनी तू मोकळ्या केसात गजरा माळलेला

कुंद ओलेती हवा, नयनी धुके वेडावणारे
मी तुझा जाणीवपूर्वक स्पर्श होता टाळलेला

ऐकण्या अपुली कहाणी ही हवा आतूर होती
मात्र तू श्वासातला उल्लेख माझा टाळलेला

भाग्य मी माझे म्हणू की हे तुझे दुर्दैव आहे
या फकीरावर कशाला जीव तू ओवाळलेला 

तू मला स्वीकार आता, शोधशी का दोष माझे
तो पहा, तो पौर्णिमेचा चंद्रही डागाळलेला

दाखवू कैसे कुणाला खोलुनी काळीज माझे
मी गुलाबी वेदनांचा कोपरा सांभाळलेला

3.

जन्म म्हणजे चक्रव्यूहातून रस्ता
मरण असते मागुनी अडवून रस्ता

शोधण्यासाठी नशीबाच्या दिशेला
मी दिशाहिन चाललो भटकून रस्ता

जायचे नसतेच, पण का कोण जाणे
ठेवतो तेथेच हा नेऊन रस्ता

ठेवले ओझे अपेक्षांचे शिरावर
अन ललाटी ठेवला कोरून रस्ता

वेगळा काढू कसा काही कळेना
चालला माझातुझा गुंतून रस्ता

पोर मूर्तिमंत भासे पळसज्वाला
माणसे का, जायचा वितळून रस्ता

फक्त काही पावले दोघात अंतर
यायला जमले न ओलांडून रस्ता
______________________________

२ टिप्पण्या: