बदीऊज्जमा बिराजदार___दोन गझला



1.

तुला वाटते ती भिरभिरते तुला पाहण्यासाठी
नकोस सांगू पुन्हा-पुन्हा तू हृदय बदलण्यासाठी

तुझ्या स्मृतींचा खडा पहारा सांगत आहे मजला
नातीगोती, मान-प्रतिष्ठा तुला मागण्यासाठी.

हृदयावरच्या वेलीवरती कळ्या फुलांचे सागर
आभासाच्या कवेत घेतो तुला प्राशण्यासाठी

कधी स्मशानी वावरताना वाट मनोहर वाटे
तयार झालो मीच स्वतःने स्वतःस विकण्यासाठी

दुःखाच्या या सुवासातही जगतो सत्संगाने
घोर तपस्या परमेशाची आलो करण्यासाठी

पावसातल्या वादळात या सत्वपरीक्षा घेते
पिकलेल्या पानाला सांगे पुन्हा उमलण्यासाठी

आज तुझ्या मौनाची भाषा या हृदयाला कळते
एकदुजाच्या समीप साबिर आग विझविण्यासाठी

2.

दुष्काळाने तळमळणारा शेतकरी हा 
वणव्यामध्ये गरगरणारा शेतकरी हा 

भ्रामकतेचा शाप असावा भवतालाला 
मेघ गर्जना आठवणारा शेतकरी हा 

श्वासाश्वासामधून जे पिकविलेय सोने
स्वप्नामध्ये साठवणारा शेतकरी हा 

तळपायाला तळहाताला फोड उमटले
उजाडरानी नांगरणारा शेतकरी हा

अतिथीजैसा पाउस येतो अन जातोही
पाण्यासाठी तडफडणारा शेतकरी हा

आत्म्याची हत्या करते कर्जाचे डोंगर
परतफेडने हादरणारा शेतकरी हा

वैषम्याचे सार्थक झाले असे वाटते
साबिर जैसा सावरणारा शेतकरी हा
________________________________

1 टिप्पणी: