1.
धर्मांध देश माझा दगडास हात जोडी
सोन्यात मूर्ति जेथे..जातात देव चोरी
ठोठावले पुन्हा तू जे दार झोपडीचे
जाळे सुखात तेथे विणतात आज कोळी
अलवार स्पंदनांचे हुंकार ऐकताना
श्वासा मिळे बहाणा जगण्यास झिंग थोडी
राहू नको उगा तू गोडात समजुतीच्या
असतात भास फसवे चकव्यात सांज भोळी
मातीत पेरलेली भेगाळलीत स्वप्ने
बेमान पावसाची आशा अजून ओली
धुंडाळ ग्रंथ सारे पोथी,कुराण,गीता
माणूस वाच थोडा सहजी कळेल ओवी
2.
आश्चर्य पाहण्याला आला जमाव येथे
प्रत्येक मांजरीचा होतोय शाव येथे
गझले तुझी कशाने मी साधना करावी?
सध्या खुशामतींचा होतो सराव येथे
आधुनिक भारताचा तो नागरिक असावा
नुकताच झोपडीचा झाला लिलाव येथे
मी टाळतो अताशा भेटावयास मजला
मांडून बैसलेलो सगळा बनाव येथे
इतकेच तो म्हणाला..बरसायचे कुठे मी?
दगडात पाझरांचा आहे अभाव येथे
सगळेच सांगतो ना हा चेहरा किताबी!
म्हणुनीच आरशांचा नाही निभाव येथे
टाळू नको असा तू वेल्हाळ पापण्यांना
बेफाम वादळेही घेती पडाव येथे
3.
झाला सुन्या ढगांचा हा भार विठ्ठला
आता तुझ्या विटेचा आधार विठ्ठला
मातीत पेरला मी विश्वास आंधळा
डोळ्यात तू पिकांना साकार विठ्ठला
वारीत आज आलो घेऊन लेकरा
आहे जरा उपाशी संसार विठ्ठला
वाजे मृदुंग चिपळ्या.. संगीत अंतरी
होतो तुझ्या जपाचा ओंकार विठ्ठला
या सावळ्या तनुचा थोडा प्रकाश दे
व्यापून जीवनाला अंधार विठ्ठला
4.
पाऊसही अताशा दिसतो तिच्याप्रमाणे
भेटावया बहाणे करतो तिच्याप्रमाणे
चाहूल फक्त येता होते धरा सुगंधी
ओढाळ थेंब पानी खुलतो तिच्याप्रमाणे
बिलगून घट्ट असते..बहुधा जुनी जखम ही
ओल्या झडीत ग़ालिब छळतो तिच्याप्रमाणे
असतात जीवनाला लाखो छटा फिरंगी
प्रत्येक रंग वेडा नसतो तिच्याप्रमाणे
हिरवा चुडा बिलोरी..देहात वीज थोडी
हा घाट पावसाळी सजतो तिच्याप्रमाणे
दोघात सख्य इतुके आहे युगायुगांचे
जाताच दुःखफेरा वळतो तिच्याप्रमाणे
पेल्यातली कहानी आता कुठे कळाली
एकेक घोट जेंव्हा ठसतो तिच्याप्रमाणे
तू वाचलेस साहिर डोळे तिचे पहाटे
मिसरा तुझा रूहानी बनतो तिच्याप्रमाणे
___________________________________
खूप छान
उत्तर द्याहटवापहिल्या गझलेची पहिली ओळ भारून गेली
धर्मांध देश माझा दगडास हात जोडी
सोन्यात मूर्ति जेथे..जातात देव चोरी
पहिली गझल मनाला भावली.
उत्तर द्याहटवा