डॉ. राम पंडित___सामाजिक वेदनेचा भाष्यकार


साठोत्तरी कालखंडातील उर्दू कवितेतील एक महत्त्वाचे कवी म्हणून बशर नवाज यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा प्रस्थापित केली. नुकतेच त्यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने..



पत्थर को मेरे सिम्त तो
आना जरूर था
मैं ही उन गुनहगारों में
एक बेकसूर था..
केवळ प्रेम केले म्हणून लैला-मजनूला लोकांनी दगडं मारली, तसंच आजच्या युगात निरपराध माणूस अपराधी ठरवला जातो, असे सार असलेल्या या शेरातून बशर नवाज यांनी समाजातील वास्तवावरच प्रकाश टाकला आहे. साठोत्तरी कालखंडातील उर्दू कवितेतील एक महत्त्वाचे कवी म्हणून बशर नवाज यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा प्रस्थापित केली. तरक्कीपसंद शायरीतून उर्दू कवितेला जदीद शायरीकडे- म्हणजेच आधुनिक शायरीकडे वळवण्याचे श्रेय ज्या मोजक्या कवींकडे जाते त्यातील बशर नवाज हे अग्रणी नाव आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. निदा फाजली, शहरयार यांच्या समकालीन असलेल्या बशर नवाज यांचे नज्म- म्हणजेच कविता आणि गजल या दोन्हींवरही तेवढेच प्रभुत्व होते. उर्दू, हिंदूी, इंग्रजी भाषेतील अभिजात साहित्यप्रवाहांचा अभ्यास, अभ्यासातून आलेली समीक्षेची जाण आणि त्याला पुरोगामी चळवळीची जोड यामुळे बशर यांची नज्म रसिकांच्या थेट काळजाला जाऊन भिडते. सामान्यांच्या व्यथा-वेदनेला आपल्या काव्यातून थेट मांडणारे बशर नवाज यांचा उल्लेख ‘सामाजिक वेदनेचा भाष्यकार’ असेच करणे सयुक्तिक ठरेल.
बशर म्हणजे माणूस आणि नवाज म्हणजे नावाजलेला किंवा गौरविलेला. आपल्या प्रतिभेने बशर यांनी शायरीला ‘नवाज’ केले. १९७५-७६ या कालावधीत औरंगाबादेत सिकंदर अली वज्द वास्तव्यास होते. ते हाजी अलीला माझे शेजारी होते. त्यामुळे औरंगाबादला सिकंदर अली यांच्याकडे मी नेहमी जात असे. तेथेच माझी बशर नवाज यांच्याशी ओळख झाली. बशर यांच्या काही उर्दू कवितांचा मी मराठी अनुवाद केला होता. अनंत भालेराव यांनी ‘मराठवाडा’मध्ये त्या कविता प्रसिद्ध केल्या होत्या. ‘रोमँटिसिझम’ म्हणजेच प्रेमभावना व्यक्त केल्या जाणाऱ्या उर्दू शायरीचा बशर यांनी सामाजिक, राजकीय व आर्थिक प्रश्न मांडण्यासाठी चपखलपणे वापर केला. बशर यांच्या शेरामध्ये या प्रश्नांचे प्रतीकात्मकरीत्या प्रतििबब उमटले आहे. ज्येष्ठ उर्दू कवी काझी सलीम, बशर नवाज आणि मी अशा आमच्या संपादक मंडळाने मराठीतील साहित्य उर्दूमध्ये आणि उर्दूतील साहित्य मराठीमध्ये असे चार खंड महाराष्ट्र शासनासाठी संपादित केले होते.
छंदशास्त्रावर हुकमत आणि अभिजात उर्दू शायरीचा व्यासंग हे बशर नवाज यांचे अनोखे वैशिष्टय़. औपचारिकदृष्टय़ा त्यांचे शिक्षण फारसे झाले नसले तरी सामाजिक अनुभवाच्या शाळेत त्यांनी ज्ञानसाधना केली. एकदा औरंगाबाद येथील सुभेदारी गेस्ट हाऊस येथे उर्दू कवी फैजल जाफरी यांच्याशी त्यांचे वैचारिक वाद झाले. तेव्हा त्यांनी रात्री अकरा ते पहाटे चारदरम्यान रंगवलेल्या मैफलीमध्ये त्यांनी मुखोद्गत असलेले गालिब, मीर, अनिस, सौदा, अजगर गोंडवी, यगाना चंगेजी यांचे हजारो शेर ऐकवले. या मैफलीचा मी साक्षीदार होतो. दिल्ली आणि लखनौ या शहरांबरोबरच महाराष्ट्र आणि त्यातही मराठवाडा हे उर्दूचे प्रमुख केंद्र राहिले आहे. त्यात बशर नवाज यांचा महत्त्वाचा वाटा आहे. हे त्यांचे श्रेय कुणालाही नाकारता येणार नाही. साहिर लुधियानवी, मजरुह सुलतानपुरी आणि कैफी आझमी यांच्यासारखे शायर उपजीविकेसाठी मुंबईला आले व चित्रपटसृष्टीमध्ये रमले. चित्रपटगीतांमुळे हे शायर सामान्य रसिकांपर्यंत पोहोचले. त्या धर्तीवर ‘बाजार’ चित्रपटातील ‘करोगे याद तो हर बात याद आती है’ या एकाच गीतामुळे बशर नवाज अजरामर झाले. पण चित्रपटांपेक्षाही ते आपल्या मनपसंत असलेल्या शायरीच्या प्रांतामध्येच रमले. ‘रायगा’ हा बशर नवाज यांचा पहिला कवितासंग्रह. रायगा म्हणजे व्यर्थ किंवा निर्थक. माझ्या मित्राच्या या संग्रहाची दुसरी आवृत्ती मी प्रकाशित केली होती. त्यानंतर ‘अजनबी समुंदर’ हा दुसरा कवितासंग्रह आला. महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र उर्दू अकादमीने बशर नवाज यांना सन्मानित केले आहे. साहित्य अकादमीनेही बशर नवाज यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

बशर नवाज यांचे काही शेर

काफिलेवाले चल दिए छोडके
चंद नक्श ए पा (पदचिन्हे)
देखा न मुडके फिर कभी
जैसे कि रह गुजर के हम
(सोबती असलेले केवळ पदचिन्हे ठेवून मला सोडून गेले. त्यांनी वळूनही पाहिले नाही. जणू मी सडक म्हणजे रस्ता होतो.)
पत्थर भी अपनी सिम्त न आए
कहाँ के फूल
हम भी बहुत दरींचों
के नीचे खडे रहें
(दगडंच जिथे माझ्या वाटय़ाला आले नाहीत तिथे फूलं कोठून येणार. इथे योग्य माणसाची किंमतच कुणाला कळत नाही)
झुलसी दिलके आंगन में
हुवी ख्याबोंकी फिर बारीश
कहीं कोंपल लहक उठी
कही पत्ता निकल आया
(पोळलेल्या हृदयाच्या अंगणात पुन्हा स्वप्नांचा पाऊस पडला. आशादायक वातावरणात कुठे तरी अंकुर फुटला. कुठे खात्रीचे पान फुटले.)
बहुत खौंफ जिसका फिर
वही किस्सा निकल आया
मेरे दुख से किसी आवाज का
रिश्ता निकल आया
(दु:खाचे स्मरण जागविणारा शेर)

- डॉ. राम पंडित
शब्दांकन : विद्याधर कुलकर्णी
____________________________________________________
(लोकसत्ता_लोकरंग पुरवणी_दि.12 जुलै 2015 वरून साभार)



Web Title: Bashar Nawaz

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा