1.
कोणी कशात गेला , कोणी कशात गेला
येईल सौख्य दारी या भरवशात गेला
" जिंकीन या सुखाला " वदला कुणी शहाणा
परवा कळून आले, तोही अशात गेला
खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले
बेकार काळ वाया बघ उठबशात गेला
आहे धुवायचे तर खंगाळ या मनाला
पुरुषार्थ काय त्याचा जो कपबशात गेला
दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची
आलाप घेतला तो गवई घशात गेला
सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा
आजन्म पांगळ्यारे तू कवडशात गेला
2.
कुठे कृष्ण- राधा कुठे रास आता
तसाही फुलांना कुठे वास आता
विळ्याभोपळ्याने गळाभेट घ्यावी
असा राहिला का कुणी ' खास ' आता
मला पनवती अन तुला राहु- केतू
कुठे आपलीही जुळे रास आता
जरी माणसांना असे टाळले मी
भुतांचेच होती तरी भास आता
सदा घेत जा तू तपासून नाडी
मनाचा तनावर अविश्वास आता
भुकेलाच होता भुकेलाच आहे
असा 'देव' तोही इथे ' दास ' आता
3.
मागे जयजयकार चालला आहे
चौखांद्यावर स्वार चालला आहे
वाटेलाही लाज वाटली थोडी
या वाटे तो फार चालला आहे
आप्तानाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे
जाळ्यामधुनी मुक्त जाहला "तो ' ही
केवळ हा उपचार चालला आहे
होवो अथवा काकस्पर्श ना होवो
या पिंडातुन पार चालला आहे
भाळी त्याच्या भस्म रेखिले होते
सरणावर संस्कार चालला आहे
भिंतीचा आधार चालला आहे
ओट्यावरचा भार चालला आहे
4.
जगण्याचेही किती बहाणे करतो आपण
मेल्यावरती खरेखुरे ते मरतो आपण
खाण्यासाठीच हे जिणे की जगण्यासाठी
ठावी एकादशी तरीही धरतो आपण
सारे जागे, हमाल केवळ घोरत असतो
ओझे सारे मनावरी पांघरतो आपण
केले आम्ही महाग इथले दानापाणी
चंदर, मंगळ किती कुटाणे करतो आपण
झाल्या दुर्मिळ जिवाशिवाच्या गाठीभेटी
आंतरजालावरून का वावरतो आपण !
गेले सगळे रित्याच हाती जातानाही
येणार्यांची उगाच गोणी भरतो आपण
___________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा