1.
सांत्वनाचा दिवा आत येऊ नये
दुःख माझे उजेडात येऊ नये
हुंदके चावती,आसवे चावती
वेदनेला नवे दात येऊ नये
तुजविना पोरकी ज्यात माझी मिठी
हाय, ऐसी कधी रात येऊ नये
मी सुखे शोधतो आज राखेत या
पण निखारेच हातात येऊ नये
जर घरंदाज तू तर घराचे तुझ्या ,
सोवळे वाद चौकात येऊ नये
यार, स्वप्नात ही येत जाऊ नको
ऐकले, सर्प स्वप्नात येऊ नये
मानवी थोरवी मानण्याच्या कधी
आडवी कोठली जात येऊ नये
2.
तुला जिथे वादळणे आहे
मला तिथूनच वळणे आहे
विजेस कां रे जीव लावला
तुझ्या नशीबी जळणे आहे
पुढे धबधबा आहे, पाण्या
अता तुला कोसळणे आहे
पहिल्या-वहिल्या पावसात ही
गरिबाचे घर गळणे आहे
तुझाच होतो, तुला परंतू
मी गेल्यावर कळणे आहे
प्रारब्धाचे भोग, साजणे
काय कुणाला टळणे आहे
आयुष्याचे दळण शेवटी
जमेल तैसे दळणे आहे
3.
राहुदे माझ्या उशाला रात माझी
चेतण्याची ही खरी सुरुवात माझी
सळसळाया लागलो आता कुठे मी
एवढ्यातच टाकली मी कात माझी
आठवण येणार नाही, सांगतो मी
सोय-यांना या उभ्या जन्मात माझी
श्वास तू घेशील सखये, सांग कैसा
पोकळी हृदयातली निर्वात माझी
सांग मी कुठल्या ऋतुचे नाव घेऊ
ना उन्हे, थंडी न ही बरसात माझी
सांग रे वा-या, पुसे घरटे रिकामे
हरवली का पाखरे रानात माझी
___________________________
वाह..गुरुजी.. ___/!\___एकेक शेर सहजसुंदर..!
उत्तर द्याहटवासर तिन्ही गझला खूप आवडल्या ,यातील सहजता तर मनाला खूपच भावसली.
उत्तर द्याहटवा