प्रथमेश तुगांवकर___चार गझला




1.

साधना असते गझल अन शब्दही ध्यानात असतो 
धारणा वृत्तात पण... दृष्टांत ह्या रसिकात असतो 

ओळखीचे दार असते ओळखीचा उंबरा पण 
आत गेल्यावर समजते मी उभा परक्यात असतो 

वेदनेचे वर्ग घेते कोवळी गर्भार शाळा 
एक त्या आईपणाचा दाखला पोटात असतो

शिकवली नाही कुणी भाकर कशी थापायची, पण 
शिकवण्याचा मार्ग त्या भूकेस बहुदा ज्ञात असतो

खरबुड्या हातात जपते केवढे वात्सल्य आई
स्पर्शता ती ,मी उबेच्या मंद झोपाळ्यात असतो

चांदणेही तेच असते सूर्यसुद्धा तोच असतो 
कालचा का मीच केवळ आजच्या शोधात असतो 

लागते जेंव्हा समाधी खोलवर माझ्यात माझी 
वाटते तेंव्हा मला की मीच देव्हा-यात असतो 

थंड होतो देह हा होताच मृत्यू ,पण खरेतर 
गोठलेल्या भावनांचा गारवा देहात असतो 

पिंजरा तोडून आलो काल मी त्या सभ्यतेचा 
घेत मी आता भरार्‍या मुक्त आभाळात असतो 

2.

फार नाही लाव थोड़ा जीव माझ्यासारखा 
हुंदका वाटेल तुजला मग दिलाशासारखा 

काढण्या पायातला काटा जुना ..नव्हते कुणी 
वाटला काटा पुन्हा तो खोल गेल्यासारखा 

चार घाशी जीवनाला दोन घासांचा लळा 
घासही ताटात येतो पोट भरल्यासारखा 

संपणे सुद्धा नवी सुरुवात होऊ लागते 
फक्त तू वागत रहा निर्भीड लढल्यासारखा 

का दगड चाले प्रवाहाच्या दिशेने आजही 
वागतो आहे नदीवर जीव जडल्यासारखा 

फक्त आशेवर तुझ्या स्वप्नील सेतू बांधला 
पण तुझ्याविन तो दिसे पाण्यात बुडल्यासारखा 

हास्यही त्याचे असे साच्यात बनल्यासारखे 
वर टणक ..पण तो खरा आतून तुटल्यासारखा 

3.

मनासारखे जगल्याने मी वेडा ठरलो होतो 
धुडकावत गेल्यावर दुनिया अजिंक्य बनलो होतो 

इतकीच म्हणावी मिळकत ह्या माझ्या आयुष्याची 
आजन्म सदिच्छेवरती  मी जीवन जगलो होतो

नुसतेच तुणतुणे झाले बघ माझ्या आयुष्याचे 
बोटांनी नियतीच्या मग..मी वाजत बसलो होतो

तू दूर जराशी जाता आयुष्य खिळखिळे झाले 
मज कळले आभाळातुन अलवार निखळलो होतो

वादातित मुद्द्या वरुनी तू भांडत बसते जेव्हा 
मौनाच्या मुद्द्यावर मी मुद्दाम घसरलो होतो

लिहिलेल्या ओळी काही लिहिताना कळल्या नाहित 
पण वाचत गेल्यावर मी त्यांच्यात मिसळलो होतो

मी अजुनी पाळत आहे बेतालाचेच घराणे 
पण गाणे तू गाताना का तेच विसरलो होतो

मी अंधाराचे घरटे तू त्यात कवडसा हळवा 
मी तुझिया सहवासाने आतून उजळलो होतो

जग नाकारत गेल्यावर आकार दिला मजला मी
मी आकारत गेल्यावर दुनियाच विसरलो होतो 

4.

आजही भांडायचे ? काय ते आधी ठरव 
की जुने विसरायचे ? काय ते आधी ठरव

मी मनाचे ठेवले दार ह्या उघडेच, पण
यायचे की जायचे ? काय ते आधी ठरव

लाख येतिल वादळे , पण पुढे चालायचे
की पुन्हा परतायचे ? काय ते आधी ठरव 

शेवटी तू मुखवटे काढल्यावरती जुने
मग नवे लावायचे ? काय ते आधी ठरव

ह्या मना... फुटता झरे .. वाट दे त्यांना जरा
की झरे बुजवायचे ? काय ते आधी ठरव 
_________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा