1.
वाटे भल्या पहाटे उमलून कैफ यावा...
आणिक तिने दुरावा हलकेच मालवावा.
उचलून हात दोन्ही बांधेल केस मागे...
त्या देखण्या क्षणाने अलवार तोल जावा.
हातात काकणांची मैफल सुरू रहावी...
सैलावल्या मिठीतच एकांत किणकिणावा.
रात्री पुन्हा निखळल्या सोडून अंबराला
जेव्हा तिने दिलेला मानेस हेलकावा.
आता अपूर्णतेची संपेल बादशाही
ओढून हात माझा हृदयी तिने धरावा.
सांगा तिच्याविना मी बिलगू कसे कुणाला
हा जन्म पेलण्याचा नाही दुजा विसावा.
2.
तू कवितेतून हरवता, एकाकी होते अक्षर
सुरवंट समाधी घेतो, कोषात अडकते उत्तर.
केव्हाच्या साजणवेळा क्षितीजावर तिष्ठत बसल्या
तू रुसल्यावर माझ्यावर हे घडते नाट्य निरंतर.
चारोळी लिहितो तुरळक, शब्दांची उडते दैना
गझलेचा हातच सुटतो अन् वाढत जाते अंतर.
पारोशा तुजविण वेळा, क्षण कळण्याआधी विरती
डोळ्यांशी लढण्यासाठी अश्रूही होती तत्पर.
काळोख चढाई करतो , तू नसल्याचे कळल्यावर
सोडून दिव्यांचे मनगट, ज्योतींचे उडते अत्तर
किरणांची भरते शाळा दुर्मुखल्या खोलीमध्ये
हळव्याशा जमिनीवरती खपल्यांचे विणती अस्तर.
घर थकलेले म्हातारे हळवे ही नव्हते केव्हा.
डोळ्यात भरूनी पाणी टपटपते आता छप्पर
तू घरटे सोडुन जाता, भिंतींना हसती दारे
खिडकीच्या काचेवरती, बस ! एकांताची टक्कर.
________________________________________
शिल्पाजी अभिनंदन । तुम्ही सादरीकरण ही खुप छान करता । रविंद्र कामठे पुणे
उत्तर द्याहटवा