1.
यात दिसतो म्हणे चेहरा आपला
आरसा आज पाहू जरा आपला
मी कशाला जगाची करू काळजी?
मी भला अन भला पिंजरा आपला
अनुभवाच्या फळ्यावर लिहुन अक्षरे
हात झाला किती पांढरा आपला
मुक्त जगतोस तू धुंद वा-यापरी
सैल सोडू नको कासरा आपला
घाव सोसूनही मी पहा जन्मभर
चेहरा ठेवला हासरा आपला
चंद्रमौळीतली देखणी लेखणी
आतला हा धुमारा बरा आपला
लावले तू कितीही मुखवटे तरी
चेहरा झाकतो का खरा आपला ?
तुज मिळाले कधी स्थैर्य रे जीवना?
थांबला ना कधी भोवरा आपला
2.
किती अर्थ लावू तुझ्या बोलण्याचे
नवेसे खुलासे जुन्याशा चुकांचे
चुका सर्व माझ्या कळाव्या मला पण
नको ना विचारू खुलासेच त्यांचे
अजुन हाय ज्याची न ओळख नभाशी
कुणी छाटले पंख त्या पाखराचे ?
असावेत काही खुळे श्वास बाकी
तपासून पाहू हृदय पाकळ्यांचे
म्हणालास की हा दुरावा नको अन्
जमेना तुला बोलणेही तहाचे
असा गुंतवू जीव विळख्यात त्यांच्या
नको सोडवू पाश हे रेशमाचे
अबोला तुझा का अशा चांदराती ?
हरवले पहा हास्यही तारकांचे
तुला दाखवू का उसवून अंतर?
नसे नाव तेथे तुझ्याविन कुणाचे
लिहाव्या किती मी गजल अन रुबाया
कसे पाघळावे हृदय कातळाचे ?
अता राहिले काय माझे स्वतःचे
तुला वाहिले अर्ध्य या जीवनाचे
3.
आठवणीचे मध ओघळते हलके हलके
अस्तित्वाचे भान हरपते... हलके हलके
निरखत असता गतकाळाची छायाचित्रे
गर्भरेशमी शाल उकलते ...हलके हलके
आभाळाच्या कंदीलातुन क्षितिजावरती
ही सोनेरी सांज झिरपते ...हलके हलके
कधी लोचनी काळोखाची झालर धरते
स्वप्न उषेचे कधी उमलते ...हलके हलके
एकांताच्या वेशीवरती फिरता, फिरता
रंग गुलाबी मन पांघरते ...हलके हलके
वाळूवरती काढत जाते रेघोट्या अन्
नकळत त्याचे नाव उमटते...हलके हलके
दर्पणात ती पाहुन जाते जेव्हा, जेव्हा
बिंब शशीचे असे उगवते ..हलके हलके
परतीचा क्षण समीप येता ती बावरते
जड पाऊली मागे वळते...हलके हलके
________________________________
हलके हलके गझल विशेष आवडली! खास तर पहिले तीन शेर आणि त्यात ही तिसर्या शेरातले शब्दचित्र खुप सुंदर...अभिनंदन
उत्तर द्याहटवावा अल्पनाजी
उत्तर द्याहटवाआपली शब्दकळा नेहमीच मानाचा ठाव घेते