1.
चित्र आता वाटते सुंदर दुराव्याचे
एक तप उलटून गेल्यावर दुराव्याचे
सोबती होतो कधी ते आठवत नाही
साचले आहेत इतके थर दुराव्याचे
एवढ्या गर्दीत तो हरवेल कायमचा
बोट तू हातात कायम धर दुराव्याचे
एकही तुकडा कुणापाशी नसे त्याचा
फोडले नाहीच मी खापर दुराव्याचे
भेट झाली नाईलाजाने तुझ्याशी, पण
राहिले भेटीस त्या अस्तर दुराव्याचे
प्रश्न केला एकदा मी फक्त प्रेमाचा
का मिळावे जन्मभर उत्तर दुराव्याचे
एक घण हातात आहे फक्त आशेचा
पाडुनी टाकेन मी हे घर दुराव्याचे
2.
कल्पना एक होती खरी वाटते
तूच येणार माझ्याघरी वाटते
शब्द माझेच परतून येती पुन्हा
खोल माझ्यात झाली दरी वाटते
साथ सोडून जी जात नाही कधी
ती निराशाच आता बरी वाटते
स्वच्छ हसणे कधीचे विसरलाय तो
लेक नाही सुखी सासरी वाटते
रंग काळा जगाचा किती विठ्ठला
आज काया तुझी पांढरी वाटते.
3.
घराला राहिले आता कुठे घर
स्वत:चे गाव सोडुन चालले घर
असे प्रत्येक जागी वाटते की
इथे नक्कीच नाही आपले घर
कसे माझ्याघरी पोचायचे मी
असे रस्त्यात जर आले तुझे घर
मिळाया फक्त दर्जा 'बायको'चा
तिला सोडून यावे लागले घर
विकत घेऊन आलो एक जागा
विकावे लागले आहे जुने घर
मलाही धीर झाला एकदाचा
तुलाही पाहिजे होते नवे घर
छान गझला आहेत ज्ञानेष! पहिल्या गझलेत अस्तर, उत्तर, दुसर्या गझलेत दरी आणि तिसर्या गझलेत २,३,५,६ विशेष आवडले. अभिनंदन!
उत्तर द्याहटवाछान आहेत
उत्तर द्याहटवावाटते ही विशेष आवडली
_/\_ ज्ञानेश दा
उत्तर द्याहटवा_/\_ ज्ञानेश दा
उत्तर द्याहटवाआवडल्या 3नही
उत्तर द्याहटवाघर जास्त आवडला
माझा एक शेर आठवला
वाचल्यावर ती गझल मी केवढा आनंदलो
शेर माझ्या विठ्ठलावर योजला आहेस तू
~वैवकु