1.
पत्र गुलाबी वाचुन उत्तर सरकारी पाठवले
वयात आलेल्या उर्मीला माघारी पाठवले
असे शांत होऊन बसावे संध्याकाळी आपण
जणू कोणत्या संन्याशाला संसारी पाठवले
जितके मनात होते तितके लिहून दमलो आहे
पुन्हा कशाला नवीन अक्षर तू दारी पाठवले?
कामाच्या दिवसांसाठी मी श्वास तुला मागितले
मान्य मला तू पाठवले.. पण रविवारी पाठवले
कधी मला तो भेटलाच तर विचारेन मी त्याला
दुःख एवढे कोणासाठी जरतारी पाठवले?
2.
पुन्हा चेकाळलो होतो नजर बघण्या दिवाणी मी
पुन्हा धिक्कारलो गेलो तुझा कोणीच नाही मी
स्वतःचा गंधही नाही,स्वतःचे तेजही नाही
तुझ्या आशेवरी शृंगारलेला परप्रकाशी मी
मला सोडून तू जाशील कोठे सांग ना आता
तुझा अंधार मी सगळा, तुझी सगळी झळाळी मी
पुरेसा भाबडा असल्यामुळे तर सांगतो आहे-
तुझ्या नावावरी करवून घे आहे निनावी मी
मला हे सांग की तुझिया मनाचे दार का उघडू ?
स्वतःच्याही मनाची हरवुनी बसलोय चावी मी
मला जगण्यास पुरतो जर चिमुकला दूरचा तारा
कुण्या आकाशगंगेची झळाळी का जगावी मी ?
3.
शब्द बेहोश कर, मौन मदहोश कर
खूपसे बोललो वायफळ आजवर
थेट मरणार नाही उन्हाने कुणी
पाज अलगद कवडशांमधोनी जहर
एक शाश्वत अशी पानगळ दे मला
जीवना रे नको एक नश्वर बहर
झाक डोळे ढगानेच चंद्रा तुझे
चांदणीचा ढळू लागल्यावर पदर
खूप शृंगार केला ऋतुंनी तरी
सांगते काय ही वाळलेली नजर
थांबण्याएवढे भाग्य नाही तुझे
चालण्याएवढा मार्ग नाही सुकर
____________________________
सुशांत कस रे सुचत तुला एवढ्या लहान वयात ।भारी । रविंद्र कामठे पुणे
उत्तर द्याहटवा