1.
वेदना माझ्यावरी दिलदार झाली
तीच माझी शेवटी घरदार झाली
तू बिलगली मग मला कळलेच नाही
रात्र थंडीची कधी उबदार झाली
ताठ पाठीचा कणा ज्या माणसांचा
तीच येथे माणसे कलदार झाली
देश त्यांनी घडविला काही असा की
फक्त येणारी पिढी मतदार झाली
कास्तकारांच्या पिढ्यांचा घाम जिरला
येथली माती अशी कसदार झाली
2.
जीव माझा जाळतो, मी झीज करतो
जीवनाची मी अशी बेरीज करतो
काळजाला मीच माझ्या धीर देतो,
रोज दुःखाला जुन्या खारीज करतो
पाहणे साधेसुधे असते तुझे पण,
राहिलेले काम मग काळीज करतो
चेह-यांना हसविण्यासाठी खुबीने,
आसवे डोळ्यात विदुषक 'फ्रीज' करतो
केवढी ही चालली धडपड जिवाची,
मी सुखासाठी किती तजवीज करतो
बोलतांना ठेवतो साखर जिभेवर,
तोच लोकांची मने काबीज करतो
3.
सहवास जर तुझा तर हे दुःख खूप नाही
जगण्यात मज तसाही उरला हुरूप नाही
येतात रे कळ्यांच्या फुलण्यात अडथळेही
लिहले कुणी फुलांची दुनिया कुरूप नाही
मैत्रीमधे कितीही घे पारखून मित्रा
मी मोकळ्या मनाचा हृदयी कुलूप नाही
सोसायटीत त्यांच्या मजला प्रवेश नाही
त्यांना हवे तसे रे मज रंगरूप नाही
केवळ पिढ्या बदलल्या तक्रार ना बदलली
'भाजीत तेल नाही' 'वरणात तूप नाही'
भिंतीत चार अजुनी अडकून बैसला तू
का? मोकळे तुझे रे देवा स्वरूप नाही
बदनाम नाव माझे बस एवढ्याचसाठी
या बेगडी जगाशी मी एकरूप नाही
_________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा