अभिषेक उदावंत___तीन गझला


    
              
1.  
            
आहे जरी तुझ्या रे रक्तात राजकारण
आणू नकोस अपुल्या दोघात राजकारण

सौख्यात नांदणारे का मागतात हिस्सा ?
आले मधात त्याच्या शेतात राजकारण

चिमणे तुझ्या पिलांना दाणा कुठे मिळेना
सारे फवारलेले गावात राजकारण

असतील फार साधे दाणे म्हणून भरडले
कळले नसेल त्यांना जात्यात राजकारण

देती भिकारड्याला ते दोन चार आणे
अन् गावभर तयाचे करतात राजकारण

जर द्यायचा तुला तर दे रंग पावसाचा
झाले गढूळ सारे रंगात राजकारण

विश्वास राहिला ना आता कुण्या ऋतूंवर
आले जसे फुलांच्या लक्षात राजकारण

ही शांत गाय माझी का दूध देत नाही
शिजले असेल काही कळपात राजकारण

2.

कधी सकाळी, कधी दुपारी, संध्याकाळी
भेटत होतो आपण दोघे ऐकेकाळी

माझे चुकते तसे तुझेही चुकत असावे
वाजत नाही एका हाताने गं टाळी

आधी होते आता कोठे तसे राहिले
मी दिसलो की, आठी पडते तुझ्या कपाळी

तू चिडली की, स्मशान होते माझे अंगण
तू  हसली की, सडा सारवण, रंग दिवाळी

3.

एक राजा ,एक राणी अन परी 
वास्तविकता तेवढी नाही  खरी 

एकटा जावू नको रामा कुठे 
सोबतीला ठेव तू रावण तरी

भाकरीची सोय नाही खायची
झोपडीला पाहिजे झुंबर घरी

 मी समाधानी तुकोबासारखा
भेटते जी रोज अर्धी  ती बरी

पारदर्शी काय आता राहिले 
वाढली माझ्या तुझ्या मधली दरी
_______________________________


______________________________________

२ टिप्पण्या:

  1. करते भल्याभल्यांचे हे घात राजकारण. ...
    आणू नकोस बाबा अपुल्यात राजकारण....

    खापर पराभवाचे माझ्याच फोड माथी...
    आहे म्हणे तुझ्याही रक्तात राजकारण....

    अमित वाघ

    दोन मिसरे मिळून मतला झालेला दिसतोय. ...

    उत्तर द्याहटवा
  2. करते भल्याभल्यांचे हे घात राजकारण. ...
    आणू नकोस बाबा अपुल्यात राजकारण....

    खापर पराभवाचे माझ्याच फोड माथी...
    आहे म्हणे तुझ्याही रक्तात राजकारण....

    अमित वाघ

    दोन मिसरे मिळून मतला झालेला दिसतोय. ...

    उत्तर द्याहटवा