गणेश शिंदे___तीन गझला


1.

तुलाही हवी अन मलाही हवी
जगायास थोडी नवी पालवी

खरे सांग मी डाव खेळू कसा
तुझी पावसा रे नियत पाशवी

जमेना तुझ्याशी मला भांडणे
मुळातच तुझे बोलणे लाघवी

मला चंद्र मागू नये तू सखे
इथे भाकरी भेटणे थोरवी

किती बोलती भडभडूनी मला
तुझे डोरले अन तुझी जोडवी

किती काळ गेला अजुन शोधतो
कुठे भेटते जिंदगी वाजवी

जुने टाळणे सोड आता तरी
नवी राहते गोष्ट कुठवर नवी?

2.

तू येण्याच्या आधी काही तू गेल्याच्या नंतर
सखये मी मग मोजत बसतो दोघांमधले अंतर

कळले- सोपे नसते आयुष्याचे चंदन होणे
वेढा घालुन बसलेला प्रश्नांचा नाग निरंतर

येता-जाता 'तो' डोकावत असतो  विहिरीपाशी
'भरल्या' विहिरीतुन नक्की जगण्याचा मिळतो मंतर

सारवलेली मायेने स्वप्ने शेणा-मातीची
फरशीवर त्यांना 'पुसण्या'वाचुन नाही गत्यंतर

कृष्णाला पाहुन त्या पुतनेलाही फुटला पान्हा
मग का आजमितीच्या कैक यशोदांचे स्थित्यंतर?

3.

आनंदी आयुष्याची एखादी ओळ लिहावी
जी दुःखाच्या मंचावरती आधारास पुरावी

इतक्या वेळा तुटलो की उठताही आले नाही
या तूट-फुटींची सांगा,कोणी भरपाई द्यावी?

आयुष्याचे अवघे जगणे नितळ करावे म्हणतो
फक्त जरा श्वासांची तुरटी देवा पुरुन उरावी

आभाळाचा हेवा अन धरतीशी वैर नसावे
जाणुन मोठेपण इतरांचे आपण लवती घ्यावी
____________________________________

३ टिप्पण्या:

  1. छान! पहिल्या गझलेतेले पालवी आणि लाघवी शेर विशेष आवडले. अभिनंदन!

    उत्तर द्याहटवा
  2. गणेशजी मस्तच आहे त गझला । पुण्यातल्या सुरेश भट गझलमंच मुशायर्यात होता तुम्ही ।

    उत्तर द्याहटवा