रमेश सरकाटे___दोन गझला



1.

जीवनात ह्या,नको बघू तू तोटा-घाटा
असे बुडबुडा,दान खुशीचे जरूर वाटा

केसाने पण गळा कापती सगे सोयरे
फसवित जाती आपुलकीने काढत काटा

अंधाराला निरोप देण्या दिशा उजळती 
चालत चालत सन्मार्गाच्या पाउलवाटा

कशास भ्यावे उफानल्या मी वादळ वा-या
लांघत असतो संकटात ही तुफान लाटा

उपवास मी धरु कशाला असा वेगळा 
एक सांजचा घरात नसतो ज्वारी आटा

ये ना माझ्या उम्बरठया वर ,वाट पाहतो --
नकोस दुःखा, देऊ आता उगाच फाटा

2.

कवच कुण्डले माझी तुजला देऊ  म्हणतो 
तुझ्या खुशीचे दोनच आसू घेऊ म्हणतो

दारातूनी नको हाकलू रिक्तच मजला 
सहवासाच्या दोनच घटका नेऊ म्हणतो 

व्याकुळतेने वाट पाहतो युगे युगे मी
मिळून आपण दोन घास ग जेऊ म्हणतो 

नकोस राहू भिडस्त इतुकी जशी अबोली 
तुझ्याच संगे दोन पावले ठेऊ म्हणतो 

स्मरणी माझ्या घडी घडी तू येते जाते
तुझिया स्वप्नी दोनच पळभर येऊ म्हणतो 
___________________________________

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा