करोगे याद तो... हर बात याद आयेगी...'गझलकार' सीमोल्लंघन १५ चा प्रस्तुत विशेषांक जाने माने शायर पैगंबरवासी  बशर नवाज साहेबांना समर्पित करताना त्यांची वरील ओळ सारखी मनात येत आहे.

अंकाच्या प्रारंभ  बशर नवाज यांच्या छायाचित्राने आणि डाॅ.राम पंडित यांच्या लेखाने करून औचित्य साधण्याचा माझा प्रयत्न उर्दू-मराठी गझलप्रेमींना नक्की आवडेल.

सतीश दराडेंच्या 'श्वासांच्या समिधा'ला ज्ञानेश्वर कटारेंनी दिलेली उत्फूर्त दाद अनेक रसिकांना आपली वाटेल.

हेमंत पुणेकर यांनी केलेला तीन मराठी गझलांचा गुजराती अनुवाद आणि दोन गुजराती गझलांचा मराठी अनुवाद हा प्रस्तुत अंकाचा विशेष.ह्या अनुवादासोबतच अनुवादासंबंधीचा त्यांचा एक छोटेखानी लेखही दिला आहे.अभ्यासकांना त्याचा निश्चित उपयोग व्हावा.

ह्या वर्षी गझलकारांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहून मी अक्षरशः भारावून गेलो.पन्नासाहून अधिक गझलकारांच्या अडीचशे-तीनशे गझला गेल्या आठ दिवसात मी वाचल्या.ही तिस-या पिढीची गझल वाचताना तिची गुणवत्ता आणि वेगळेपण पाहून आनंद झाला.ह्या अंकातील एक्कावन गझलकारांच्या एकशे त्रेचाळीस गझला एकत्रित वाचताना माझ्यासारखेच तुम्हीसुद्धा मराठी गझलच्या उज्ज्वल भविष्याविषयी आश्वस्त व्हाल.

अभिषेक उदावंत ह्या गझलकार मित्राने अंकासाठी काढलेली रंगीत रेखाचित्रे स्वतंत्र शेराचा काव्यात्म प्रत्यय देणारी आहेत.

गझल लिहिणा-या,वावणा-या,चर्चा करणा-या सर्वांना
विजयादशमीच्या आणि येणा-या दिवाळीच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!

-श्रीकृष्ण राऊत
संपादक,
'गझलकार' सीमोल्लंघन 15.
_______________________________________

1 टिप्पणी:

  1. राऊत सर तुमचे खुप खुप अभिनंदन । माझ्या सारख्या नवोदीत कवीला तर गझलकार सीमोल्लंघन १५म्हणजे पर्वणीच आहे । माझ्या काही रचना मला ह्या निमित्ताने तुमच्या पर्यंत पोहचवीता आल्या हेच माझे भाग्य. माझ्या शुभेच्छ्या । तुमचा आशीर्वाद लाभो हीच सदिच्छा । रविंद्र कामठे पुणे

    उत्तर द्याहटवा