गझलांचा वृत्तबद्ध अनुवाद___हेमंत पुणेकर


                       


गुजराती गझल लिहायची सुरूवात केली २००७ मधे. गझलेविषयी खुप काही शिकलो ते गुजरातीचे नामवंत गझलकार व अभ्यासक डॉ. रईश मनीआर ह्यांचाकडून. ते स्वतःच उत्तम अनुवादक ही आहेत व त्यांनी कैफी आज़मी, जावेद अख़्तर, गुलझार वगेरे उर्दू गझलकारांच्या कवितांचा गुजराती अनुवाद केलेला आहे. मी जेव्हा रईशभाईंना गुरूदक्षिणा म्हणून काय पाहिजे असे विचारले तेव्हा ते मला म्हणाले की मराठी गझलांचा अनुवाद कर. आजवर जवळ्पास १० मराठी गझलांचा वृत्तबद्ध गुजराती अनुवाद केला आहे. म्हणजेच काय अजून अनुवादक म्हणून कारकीर्द काही फार मोठी नाही तरी पण माझा अनुभव नम्रपणे सांगू ईच्छीतो. 
गुजराती विश्वकोश भगवद् गोमंडल मधे अनुवाद शब्दाची व्याख्या "अनु+वाद म्हणजे "पुन्हा सांगणे", अर्थातच "भाषा बदलून" पुन्हा तेच सांगणे, अशी दिलेली आहे. ह्या व्याख्येचा अनुषंगाने रईशभाईंनी दिलेला कानमंत्र म्हणजे "त्यांचे काही विसरू नये, स्वतःचे काही मिसळू नये". ("एमनुं कंई चूकवुं नहि, पोतानुं कंई मूकवुं नहि" ह्या गुजरातीत दिलेल्या मंत्राचा मी केलेला अनुवादच बरं का!). परंतू ह्याचे १००% पालन करणे काही शक्य नाही हे ही त्यांनीच शिकवले. जे ७०-८० टक्के दुस-या भाषेच्या रसिकांपर्यंत पोचवता आले त्याच्यातच अनुवादकाला संतोष मानावा लागतो. माझे दुसरे मेन्टर व गुजराती-उर्दूचे नामवंत गझलकार विवेक काणेंच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर "अनुवादात कवितेचा मृत्यु अटळ आहे" आणि म्हणूनच अनुवादकाला जितक्या कमीत कमी घावात तिचा फडशा पाडता आला तितकीच त्याची सफलता! असो.
गझलेचा वृत्तबद्ध अनुवाद आणखी काही बंधनं घेऊन येतो. अनुवादित रचना पण गझल असायला हवी म्हणजे यमक, अंत्ययमक, वृत्त इत्यादी स्वरूपाचे बंधन आलेच. ह्या मुळे १० गझल घेतल्या तर त्यात १ किंवा २ च गझला "अनुवाद्य" असतात. हे बंधन वाटत असले तरी तेच अनुवादकाच्या सृजनशीलतेला आव्हान देतात. छिन्नी मारल्यावर जर दगडाने प्रतिरोधच नाही दिला तर मूर्ती बनेल का? 
अनुवादकाला मूल गझलेच्या भाषेचं जुजबी ज्ञान असल्यास ही चालतं. मूल रचना समजून घ्यायला मदत घेता येते. ज्या भाषेत अनुवाद करायचा असेल त्यात अनुवादकाचे कौशल्य असणे गरजेचे. व्यग्र ह्या शब्दाचा एक अर्थ मराठीत व्यस्त असा पण होतो. पण गुजरातीत त्याचा एकमात्र अर्थ दुःखी. ज्या भाषेत अनुवाद करायचा आहे त्या भाषेत शब्दांचे नेमके अर्थ व त्यांचा वापर अनुवादकाला माहित असणे आवश्यक आहे. 
शब्दांशी अर्थाव्यतिरिक्त भाव ही चिकटलेले असतात. बरेचदा शब्द एकच असतात पण अर्थच्छटा वेगवेगळ्या असू शकतात. मराठी-गुजरातीचंच उदाहरण द्यायचं म्हटलं तर संस्कृतमधून आलेले दोन शब्द घेऊ - अभिमान आणि गर्व. दोन्ही भाषेत हे दोन्ही शब्द आहेत पण मराठीत अभिमान हा गुण आहे आणि त्याचा अतिरेक झाला तर तो गर्व म्हणजेच अवगुण होतो. गुजरातीत (आणि हिंदीत पण) अभिमान अवगुण आहे आणि गर्व हा गुण आहे. विश्व हिंदु परिषदेच्या "गर्वसे कहो कि हम हिंदु हैं" ह्या सूत्रात हिंदु म्हणून घमेंड किंवा माज नाही पण अभिमान बाळगण्याचीच गोष्ट आहे. 
आपण एकाच शब्दांचे वेगळे अर्थ पाहिले. ह्या उलट मराठी-गुजराती सारख्या भगिनी भाषेंमधे बर्याच शब्दांचे अर्थ आणि भाव समान असल्याने ते जसेच्या तसे पण वापरता येतात. 
कवितेच्या अनुवादात शब्दापेक्षा त्याचा भाव जास्त महत्वाचा. कवितेचा अनुवाद करण्यापेक्षा भावानुवाद - भाव जपून पुनर्रचना - करणे महत्वाचे. भाव जपायला म्हणून बरेचदा मूल कवितेचे शब्द, शब्द-रचना आणि कधीकधी तर पूर्ण ओळ बदलावी लागते. गझलेच्या अनुवादात यमक, अंत्ययमक, वृत्त पण बदलावे लागतात. 
शब्द बदलायचे की नाही; कोणचे बदलायचे आणि कोणचे नाही; गझलेचे यमक, अंत्ययमक, वृत्त वगेरे बदलायचे की नाही हे सर्व ठरवण्यात अनुवादकाचा कस लागतो. 

____________________________________________


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा