सुधीर मुळीक___चार गझला
1.

आजन्म घेत आलो अंदाज घोळक्याचा
गर्दीत कोण माझे?मी नेमका कुणाचा ?

या सर्कशीत बसलो हरवून चेहरा मी
नंतर दिला जगाने दर्जा विदूषकाचा.

तू मनमुराद हसली नसतीस या व्यथेवर
जर ऐकलास असता गोंगाट आसवांचा.

मी भरजरी सुखाच्या भिरकावल्यात चिंध्या
तेव्हां कुठे मिळाला सदरा कफल्लकाचा!

सांगून काय सांगू, बोलून काय बोलू ?
सांराश हाच आहे माझ्या कथानकाचा.

उरला न कोणताही संबंध वास्तवाशी
कवटाळतो उराशी आभास मृगजळाचा.

मी अपयशीच आहे कळसावरी यशाच्या
इतक्यात अर्थ कोणी लावू नये कशाचा.

2.

कुंपणाबाहेर डोकावून बघ ना
एकदा निवडुंगही जवळून बघ ना.

पाहिजे तर उंबरा लांघू नको तू
बंद दरवाजा तरी उघडून बघ ना.

रंग मेंदीचा फिका पडणार नाही
नाव माझेही कधी नोंदून बघ ना.

चंद्रही अडकेल एखाद्या क्षणाला
तू गळाला चांदणे लावून बघ ना.

चांदणेही चांदणे उरणार नाही
या उन्हाला एकदा बिलगून बघ ना.

प्रेम झिडकारूनही ती वर म्हणाली -
"त्यागही माझा कधी समजून बघ ना"

काय सांगू मी तुला माझी खुशाली 
तू स्वतःची सावली निरखून बघ ना.

शक्यतो नसणार सुटल्या नीरगाठी
आपल्या सगळ्या मिठ्या उसवून बघ ना.

3.

आसवांना स्वतःचा दरारा हवा
मग कशाला कुणाचा सहारा हवा?

काळजाच्या तळालाच आळे करा 
ओंजळींचा कशाला पसारा हवा.

सागराने कुठे मोकळे व्हायचे ?
माणसांना रिकामा किनारा हवा.

ती इमारत हवी की हवी झोपडी?  
फक्त वारा हवा की निवारा हवा ?

आग आहे इथेही तिथेही सखे
सांग तारा हवा की निखारा हवा ?

मग भले तू सुखांना नको पाठवू 
पण व्यथांना जरावेळ थारा हवा !

बाग आहे खुली पाखरांना तुझ्या 
मग फुलांवर कशाला पहारा हवा ?

पावसा रे दिला जीव बदल्यात मी
आणखी कोणता शेतसारा हवा ?

शेवटी तोच आहे खरा सोबती
पाजणारा नको, पण पिणारा हवा !

4.

जमल्यास नोंद ठेवा माझ्या पराक्रमाची
लिहिण्यात जन्म गेला गाथा पराभवाची.

घेऊन शल्य जे मी फिरलो दहा दिशांना
ती कैफियत निघाली इथल्या चरा-चराची.

आधीच सावल्यांशी होता विवाद माझा
अन त्यातही उन्हाला उपमा दिली सुखाची.

अपुल्या विसंगतीला देशील तू दुजोरा
मी शोक पंचमाचा,तू हाक मारव्याची.

सांगून टाक मी कुठल्या पारड्यात होतो
तू मोजदाद केली जेव्हा भल्या-बु-याची.

माझ्यातल्या तृषेला दुनिया तलब म्हणाली
करतात लोक हल्ली थट्टा कशा कशाची.

हारातल्या फुलांचा मग संपला महोत्सव
जर मांडली इथे मी आरास पाकळ्यांची.
____________________________________

1 टिप्पणी:

  1. सुधीरजी काय बोलायचे राव तुम्ही तर चौकारच मारला । अभिनंदन । रविंद्र कामठे पुणे

    उत्तर द्याहटवा