1.
तुझा दोन ओळीत उल्लेख आला
कुठे समजला अर्थ पण कागदाला
तुला हारताना जिथे पाहिले मी
तिथे लावले मी स्वत:ला पणाला
कशी सोडवू मी मिठी यातनेची?
दिला मीच खांदा तिला टेकण्याला.
यशाच्या दिशेने निघाले जशी मी,
तसे लोक आले पुन्हा स्वागताला
जशी थांबते पानगळती वनाची
तसा अर्थ येतो नव्या बहरण्याला
तुझ्या मीपणाचा जिथे कळस झाला
गडे थांबले मी तिथे पायथ्याला
कशाला दिला तू मला हात तेव्हा
जगावे असे वाटले त्या क्षणाला
2.
विचार भुंगा बनून मन पोखरतो आहे
आयुष्याचा वासा पोकळ करतो आहे
तुझ्यापुढे मी का घ्यावी माघार प्राक्तना?
अता सामना अटी तटीचा ठरतो आहे
इथे कुणाच्या उपयोगाला पडले नाही
इथे कळेना कोण मला वापरतो आहे
चिरंजीव दु:खाचे माथ्यावरती गोंदण
अश्वत्थामा माझ्यातच वावरतो आहे
केवळ एका तक्रारीवर मला म्हणाला
पायामधला जोडा का कुरकुरतो आहे?
वेग वेगळा देह मिळाला दरवेळी, पण
एकच आत्मा अखंड वारी करतो आहे.
3.
कुठे पडणार आहे का फरक त्याला?
तुझेही सांग उत्तर बेधडक त्याला.
अडवते मी मनाला कैकदा माझ्या
पहावे वाटले जर एकटक त्याला
कुठे लपवू तुझा मी चंद्र आभाळा?
इथे पाण्यातही खुपते चमक त्याला
कसे अंदाज इतके काढतो लवकर
म्हणावे वाटते मग 'संगणक' त्याला
कुठे धावून येतो देव हाकेला?
तसेही वागणे जमते तुटक त्याला
फुटेना काळजाला आजही पाझर
अता बोलून पाहू का खडक त्याला?
कुणी मागून घ्यावे दु:खही माझे
____________________________
फारच छान मनिषाताई । आभिनंदन
उत्तर द्याहटवा