1.
करुनी जिवाचा कान सारे लोक ऐकत राहिले,
त्याची कहानी संपली माझे मनोगत राहिले!
स्पष्टीकरण होते दिले तू कारणाविन एकदा
ज्याचे पुढे आयुष्यभर संदर्भ लागत राहिले.
पदरामधे माझ्या कधी तू घातली नाही सुखे,
जाणीवपुर्वक मग तुला मी ही दुखावत राहिले.
दिवसाउजेडी एकदा तू मारली होती मिठी,
मग रोज काळोखामधे अंतर खुणावत राहिले.
झालो असू उद्ध्वस्त आपण दूर होताना जरी
पण एक झाले आपले घरटे सलामत राहिले.
2.
तीच वळणे आजही अन त्याच रस्त्यावर,
केवढा होतो मनाला जाच रस्त्यावर.
मी कशाला सांग त्याचे गोडवे गाऊ?
जो ऋतू रेंगाळतो भलत्याच रस्त्यावर!
फार लगबग वाढते पुढच्याच वळणाला,
धूळ वा-याने जरा उडताच रस्त्यावर.
केवढे आले रडू भेटून येताना,
सांडले मोती जणू सा-याच रस्त्यावर.
एवढी निष्पर्ण झाडे लावली कोणी?
सावली नाही इथे कुठल्याच रस्त्यावर.
वाकडी कर वाट होता अर्ज यासाठी,
मी तुला देवू कशी रे लाच रस्त्यावर.
याच रस्त्याला कधी ना टाळता आले,
भाळला होतास तू ही याच रस्त्यावर.
मी कसे गाठू शिखर तुमच्या सवे आता.
टाकल्या माना तुम्ही अर्ध्याच रस्त्यावर.
घे मला भेटून तू ही आज शेवटचे.
ना पुन्हा असणार मी कुठल्याच रस्त्यावर.
भेटले रस्ते हजारो वेगळे झाले...
मी पुन्हा आहे उभी माझ्याच रस्त्यावर.
ममताताईअप्रतिम गझला आहेत ।सहजच आहेत । अभिनंदन । रविंद्र कामठे पुणे विनसीस आय टि
उत्तर द्याहटवा