1.
वाट काट्यांची निरंतर चाललो मी
मग कुठे गावी फुलांच्या पोचलो मी
पाहुनी दंग्यातल्या उध्वस्त वस्त्या
मानवी जन्मात येउन लाजलो मी
रोज घेते शोध माझा जिंदगी पण
आजवर कोठे तिलाही गावलो मी ?
मंजिली राहून गेल्या पार मागे
आंधळ्या कैफात ऐसा धावलो मी
जिंकुनी ओशाळला खुद जिंकणारा
डाव तो इतक्या खुबीने हारलो मी
2.
शल्य हेच की जाता जाता जगी पुरेसा ठरलो नाही
मित्रांमधेच वाटप झालो शत्रूंसाठी उरलो नाही
पदर तसे तर हजार होते आतुर मित्रा सांत्वनास पण
मी अभिमानी अश्रू होतो परक्या पदरी झरलो नाही
कळ्या फुलांचा सुगंध होउन दरवळतो मी अजून जगती
सरून गेलो देहाने पण गुणधर्माने सरलो नाही
दुनिये सोबत जरी हारलो सर्व लढाया पूर्णपणे मी
एक लढा पण माणुसकीचा अजून पुरता हरलो नाही
3.
बोलतो जोवर हवेसे ते तुझे सत्कार करतिल
पण नकोसे बोललाकी तेच मग धिक्कार करतिल
वध विचाराचा तुझ्या जर शक्य ना झालाच त्यांना
ते विचारा ऐवजी मग नेमके तुज ठार करतिल
कर मदत मारेक-यांची पण स्वतःची काळजी घे
माझिया नंतर कदाचित ते तुझ्यावर वार करतिल
पक्षपाती धोरणाने झाड वागू लागल्यावर
कोणत्या न्यायालयी मग पाखरे तक्रार करतिल
4.
त्या मुखी ही शांततेची बात आहे
हात ज्याचा माखला रक्तात आहे
भर अहिंसेवर दिवसभर खूप होता
आज मग नक्की कतलची रात आहे
हीच आहे वेळ आता बोल कांही
सभ्यते , तू कां अशी मौनात आहे ?
देह पोटाने जरी शहरात नेला
प्राण माझा आजही गावात आहे
आत्महत्या नेमकी उगवेल आता
भूक आम्ही पेरली शेतात आहे
घेउनी मी प्रेम आलो चल बघू या
केवढी शक्ती तुझ्या द्वेषात आहे
स्वागताला त्या घडी आला बघा जग
ज्या घडी सोडून जग , मी जात आहे
__________________________________
फारच सुंदर !!! कर मदत मारेक-यांची पण स्वतःची काळजी घे
उत्तर द्याहटवामाझिया नंतर कदाचित ते तुझ्यावर वार करतिल- क्या बात है!!!!
दर्शनजी मनस्वी आभार.
उत्तर द्याहटवाक्या बात है मसूद सर
उत्तर द्याहटवा