डॉ.सुनील अहिरराव___चार गझला



1.

जायचे आहेच तर जावेस आता
का असे वाटेत थांबावेस आता

मी तुला द्यावे असे उरले न काही
तू हवे तर दु:खही न्यावेस आता

अडथळ्यांना टाळणेही ठीक नाही
अडथळे मोडून काढावेस आता

संपवाया अंतरे माझ्यातुझ्यातिल
जवळ थोडे आणखी यावेस आता

ही किती तलखी जिवाची होतआहे
ग्रीष्म तू विझवून टाकावेस आता

मी प्रतिक्षेचा पुरावा काय देऊ
तू युगे चालून ठरवावेस आता

2.

यज्ञ आहे हा जिवाला जाळण्याचा
प्रेम नाही छंद नुसता भाळण्याचा

छान हा दु:खासही आला फुलोरा
ये, वसा घे वेदनेला माळण्याचा

आणशी हे रोज तू कोठुन बहाणे
केवढा तुज सोस आहे टाळण्याचा

मी करू चिंता कशाला काजळाची
सोडला संकल्प मी डागाळण्याचा

श्वास घे माझे तुझ्या श्वासात भरुनी
ये, ऋतू आला फुले गंधाळण्याचा

3.

खोल मी आहे किती पाहून घेतो
मी जरा माझ्यामध्ये डुंबून घेतो

सावल्यांनी पोळलो आहे इथे मी
ऊनही आता जरा फुंकून घेतो

बेगडी आहे तुझी दुनियाच सारी
मी अता रानीवनी भटकून घेतो

तू किती भिनलीस माझ्या आत राणी-
ते तुझ्या नजरेमध्ये पाहून घेतो

मी उद्या होईनही काफर कदाचित
ये, तुला थोडी फुले वाहून घेतो

4.

हा कशाला गोषवारा पाहिजे
फक्त थोडासा इषारा पाहिजे

माणसाला अन्न वस्त्रे खोपटे
शासनाला शेतसारा पाहिजे

श्वासही असतात चोरासारखे
जिंदगानीवर पहारा पाहिजे

हात या राखेतही टाकेन मी
पोळणारा पण निखारा पाहिजे

जीव ओवाळून टाकावा असा 
जीव कोणी लावणारा पाहिजे

काजवे उसने किती आणायचे
आपुला कोणी सितारा पाहिजे 

घोषणांची केवढी बुजबुज इथे-
देशव्यापी एक नारा पाहिजे

माणके मोती हिरे सगळीकडे 
फक्त कोणी शोधणारा पाहिजे
_______________________________



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा