श्रीपाद जोशी___चार गझला





1.

इच्छांवरती ताबा नाही
ताराही तुटणारा नाही

हया तर बाजाराच्या ओळी
ही कुठलीही गाथा नाही

दुःख कोणते दडले आहे
कडेलोट अश्रुंचा नाही

कृष्ण कृष्ण मन होउन जाते
माझ्या नशिबी राधा नाही

आकाशाचे पाय धरूया
मातीला ओलावा नाही

एकांताचा मनात उत्सव 
कुठला गाजावाजा नाही

हजार मैलानंतर कळले 
हा ही रस्ता माझा नाही

कसला वारा गातो आहे
हाती कुठला पावा नाही

स्वप्नांचे आकाश जिच्या हे
तिच्या अंगणी जागा नाही

प्रेम जरी मी केले आहे
माझा कुठला दावा नाही

2.

प्रत्येकाला टाळत असतो
मी माझ्याशी  बोलत असतो

माझ्या गावी वेडा आहे
रडता रडता हासत असतो

तारे तोडू शकलो नाही
मी ताऱ्यांना मोजत असतो 

हवा अंगणी खेळत असते
झोका रात्री जागत असतो

कैफ कोणता अंगी आहे
रक्तावाटे वाहत असतो 

कुणी कुणाशी बोलत नाही
सतत फोनवर खेळत असतो

चंद्र फार हा लबाड आहे
कोणावरही भाळत असतो 

3.

झिंग कोणती चढली आहे
नशेत दुनिया बुडली आहे

चल कामाला लागू मित्रा
सांज आजची टळली आहे

कशास असतो थांब्यावरती
बस केव्हाची सुटली आहे

अहोरात्र ती मिठीत असते
किती वेदना चळली आहे

अक्षर अक्षर गिरवत बसतो
कविता माझी रुसली आहे

उशास असते पत्र गुलाबी
त्यावर नौका तरली आहे

तुझी आठवण इतकी उत्कट
डोळ्यांवाटे झरली आहे

4.

तडीपार झालो तुझ्यातून आता
असा मुक्त झालो गुन्ह्यातून आता

घडावे नवेसे असे फार काही
शिकावा धडा तू जुन्यातून आता

तसा चार दिवसात जाणार होतो
वगळता न येई तुझ्यातून आता

अशी दाटलेली उराशीच संध्या
दिसावीत किरणे दिव्यातून आता

बुडालीच स्वप्ने तिथे त्या तळ्याशी
उसळशील का तू तळ्यातून आता ?

तसे फार सुंदर तुझे शहर आहे
निघावे न वाटे पुण्यातून आता
_____________________________________

५ टिप्पण्या: