1.
चंद्र मी झाकून आहे आत माझ्या
पेटलेला सूर्यही रक्तात माझ्या !
वागतो दुःखातही योद्ध्याप्रमाणे
शूर शिवबा राहतो हृदयात माझ्या !
जाळतो मी जात वशिला अन् गरीबी
ध्येयशिखरे गाठणे हातात माझ्या.
जर तुझे तुज वाटते बेरंग जगणे
घे सखे रंगून तू रंगात माझ्या.
पेरणी कवितेत अर्थाची करावी
तीच शक्ती ओततो औतात माझ्या.
जन्मलो चिखलात मी राजीव होउन
वाहतो मृद्गंध पण श्वासात माझ्या.
2.
एवढा माझ्यावरी उपकार कर
वेदने, घावात एका ठार कर
मी कुठे पाहू नये, जाऊ नये
तू सखे असला तुझा 'अवतार' कर
दूर नाही फार येथुन सुखझरा
फक्त पर्वत दु:खभरला पार कर
वेल मी नाजूक तुज स्वीकारते
खोड कडुनिंबा तुझे सुकुमार कर
जाळुनी तुज थाटली झगमग इथे
विझ... धरे, अन् पुर्णत: अंधार कर
निरस झाले फार जीवन हे सुखी
कर कधी कुरकुर, कधी तक्रार कर
जिंकणे नव्हे, लढा देणे खरे
चल, पुन्हा सुरुवात तू दमदार कर
3.
थकले विटले असाल दिनभर , झोपा आता
ओढून घ्या दुःखाची चादर , झोपा आता
रातपावले भुरळ घालती भरबाजारी
आयुष्यच बाजारू खेटर... झोपा आता
स्वप्नांचा धुरळा झालेला बघता दिवसा
सुख स्वप्नांचे भोगा मनभर, झोपा आता
यंत्रालाही हवीच थोडीशी विश्रांती
यंत्र न होतो तोच खरा नर , झोपा आता
आभाळाला लख्ख लगडल्या लाख चांदण्या
एक चांदणी तुम्हास सादर , झोपा आता
मरमर मरमर मरता फिरता कितिक वाटा
मरणे अंती एक धरोहर , झोपा आता !
____________________________________
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा