*गझलकार : सीमोल्लंघन विशेषांक १५*


ऑन लाइन क्लिक करून विशेषांकाचे प्रकाशन करताना 
रंगभूमी आणि चित्रपट कलावती ज्योती चांदेकर

सोबत ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे आणि
ज्येष्ठ गझल अभ्यासक सुरेशकुमार  वैराळकर

अनुक्रम

  • *************************************

॥ ‘गझलकार’ सीमोल्लंघन १५ ॥



करोगे याद तो... हर बात याद आयेगी...



'गझलकार' सीमोल्लंघन १५ चा प्रस्तुत विशेषांक जाने माने शायर पैगंबरवासी  बशर नवाज साहेबांना समर्पित करताना त्यांची वरील ओळ सारखी मनात येत आहे.

अंकाच्या प्रारंभ  बशर नवाज यांच्या छायाचित्राने आणि डाॅ.राम पंडित यांच्या लेखाने करून औचित्य साधण्याचा माझा प्रयत्न उर्दू-मराठी गझलप्रेमींना नक्की आवडेल.

सतीश दराडेंच्या 'श्वासांच्या समिधा'ला ज्ञानेश्वर कटारेंनी दिलेली उत्फूर्त दाद अनेक रसिकांना आपली वाटेल.

हेमंत पुणेकर यांनी केलेला तीन मराठी गझलांचा गुजराती अनुवाद आणि दोन गुजराती गझलांचा मराठी अनुवाद हा प्रस्तुत अंकाचा विशेष.ह्या अनुवादासोबतच अनुवादासंबंधीचा त्यांचा एक छोटेखानी लेखही दिला आहे.अभ्यासकांना त्याचा निश्चित उपयोग व्हावा.

ह्या वर्षी गझलकारांनी दिलेला उदंड प्रतिसाद पाहून मी अक्षरशः भारावून गेलो.पन्नासाहून अधिक गझलकारांच्या अडीचशे-तीनशे गझला गेल्या आठ दिवसात मी वाचल्या.ही तिस-या पिढीची गझल वाचताना तिची गुणवत्ता आणि वेगळेपण पाहून आनंद झाला.ह्या अंकातील एक्कावन गझलकारांच्या एकशे त्रेचाळीस गझला एकत्रित वाचताना माझ्यासारखेच तुम्हीसुद्धा मराठी गझलच्या उज्ज्वल भविष्याविषयी आश्वस्त व्हाल.

अभिषेक उदावंत ह्या गझलकार मित्राने अंकासाठी काढलेली रंगीत रेखाचित्रे स्वतंत्र शेराचा काव्यात्म प्रत्यय देणारी आहेत.

गझल लिहिणा-या,वावणा-या,चर्चा करणा-या सर्वांना
विजयादशमीच्या आणि येणा-या दिवाळीच्या
मनःपूर्वक शुभेच्छा!

-श्रीकृष्ण राऊत
संपादक,
'गझलकार' सीमोल्लंघन 15.
_______________________________________

अमित वाघ___तीन गझला





1.

नको नको ते गोळा करतो
उठाठेव ही डोळा करतो

खराब करुनी अंग स्वतःचे
साफसफाई बोळा करतो

पाठीवर मी झूल टाकतो
स्वतः स्वतःचा पोळा करतो

ती देहाचा विस्तव करते
मी माझा पाचोळा करतो

बघून घेतो बघायचे ते
नंतर कानाडोळा करतो

भूक कावळा होउन उडते
मी पिंडाचा गोळा करतो

2.

विसंबून नाही पेल्यावर
दुःखाला निर्भय केल्यावर

मुके वाटते का नजरेला
मौनाचे डोळे गेल्यावर

देहामध्ये जगतो मृत्यू
जगण्याची इच्छा मेल्यावर

विश्वासाचा परीघ चुकतो
स्वार्थाची त्रिज्या केल्यावर

गुरुत्वाकर्षण हावी पडते
हरेक उडणार्‍या चेल्यावर

3.

दुःखाची दिंडी नडली
अश्रूंना वारी घडली

मी कान्हा होउन हसलो
ती राधा होउन रडली

जठरात पेटल्या पणत्या
पोटास दिवाळी घडली

मी जन्म उन्हाचा घेता
पायात सावली पडली

जर महारोग आत्म्याला
जन्माची काया सडली
______________________

_______________________________________

श्वासांच्या समिधा___ज्ञानेश्वर कटारे

                               


मी हे जे काही लिहितोय त्याला समीक्षा वा रसग्रहण अजिबात समजू नका . कारण मी त्या दृष्टीनं लिहित नाहीचै . मला किलर दराडेंची गझल मनापासून आवडली . ' श्वासांच्या समिधा ' हा गझलसंग्रह काळजात ऊतरलाय . बास , एवढ्यासाठीच मी हे लिखान वगैरे करतोय . यात मला गझलेबद्दल फार काही कळतं किंवा मी गझलेचं पोस्टमॉर्टम करु शकतो हा मुद्दा कुठंच येत नाही ! एखाद्या सुंदर ललनेच्या प्रेमात पडल्यानंतर तिच्या हरेक नखऱ्याला आपण अदा म्हणू लागतो . तिच्यावर प्रेम केलं की तिच्या चुका वगैरे बघायची आपल्याला गरज नसते . आपण कधी तिला तिचे मार्क्स विचारत नाही . माझं हे लिहिणं तसै . मला किलर दराडेंची गझल भावली . मी तिच्यावर फिदाये . आय लव हर.. बाकी यापेक्षा जास्त काही नाही .

किलर दराडेंची एंट्री अशी धाँसू झालीये :

कधी वीणेतुनी आलो कधी टाळातुनी आलो
तुकोबाची व्यथा घेउन तळागाळातुनी आलो

विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता
तुला माहीत आहे मी मुलाबाळातुनी आलो 

आपण एकेक पान , एकेक गझल वाचत जातो . आपला आणि आजूबाजूच्या जगाचा संपर्क हळूहळू तुटत जातो . नंतर तो कधी पुर्णपणे तुटला ते आपल्याही ध्यानात येत नाही . सतीश मास्तरांच्या एकसेएक गझला आपल्याला निव्वळ म्याड करतात ! लै भयानक फिलिंग असते ती . गझला म्हटलं की निव्वळच प्रेम , प्रियसी , रुसणं , फुगणं , प्रेमभंग नव्हेच ! मास्तरांच्या गझलेला सामाजिक संवेदनशिलतेची एक हळवी किनारै . गझलकार हा संवेदनशीलच असतो . पण कधी कधी त्याला त्या संवेदना व्यक्त करताना तितका नेमकेपणा येत नाही . पण मास्तरांच्या शेरांमध्ये तो नेमकेपणा , ती अचूकता लैच राईट आढळते . आपल्या पैल्याच गझलेच्या पैल्याच शेरात मास्तर काय म्हणतात बघा :

शेतीप्रधान देशा दे एवढेच उत्तर
केव्हा भिजेल अमुची डाळीत पूर्ण भाकर

यापेक्षा अचूक काही असूच शकत नाही ! शेतीप्रधान देशात खुद्द शेतकऱ्यांचेच किती हाल चालूयेत ! सगळ्या जगाचं पोट भरणारा शेतकरी स्वतः मात्र दोन वेळच्या भाकरीच्या चिंतेतै ! फार विदारक परिस्थिती आहे ! ती अगदी जशास तशी मांडलीये दराडे मास्तरांनी...मास्तरांची गझल प्रेमात तर पाडतेच पण त्याचबरोबर विचारातही पाडते . समाजातील व्यंगांवर अचूक बोट ठेवून मास्तर ते अगदी योग्य पद्धतीनं मांडतात . कुठं भडकपणा वा कुठं अतिरंजितपणा नसतो . अगदी समर्पक शब्दांत ते आपले विचार , आपले खयाल पेश करतात .

गावामध्ये सकाळी मी ऐकली दवंडी
अश्रू पिणे शिका हो पाणी पुरेल कुठवर

सतीश दराडेंना महाराष्ट्रभर ' किलर दराडे ' का म्हणत असावेत , हा प्रश्न मला पडलेला होता . हळूहळू या प्रश्नाचं ऊत्तरही याच गझलसंग्रहात मिळालं . किलर दराडेंचे शेर अगदी साध्या सोप्या समजेबल भाषेत असतात . पण त्या शेरांची , त्या गझलांची भव्यता मात्र आपल्याला अचंबित करते ! भव्य.. दिव्य..अफाट...! त्यांच्या गझलेच्या याच कातील अदांमुळं त्यांना महाराष्ट्राच्या रसिकांनी ' किलर दराडे ' हे नाव बहाल केलंय . त्यांच्या गझलांमधील खयाल लैच अलगद असतात . लै लै लै अलगद...

भोळेपणा तिचा मी सांगू किती तुम्हाला
ती मोजते वितीने ताऱ्यांमधील अंतर 

किती अलगद.. किती निरागस.. किती ईफेक्टिव्ह.. आय लब यू किलर गुर्जी ! मन अगदी फ्रेश होतं . एकेक शेर अगदी काळजात घुसतो पण दर्द अजिबात होत नाही ! आपल्याही नकळत आपण या भोळ्या गझलेच्या प्रेमात पडतो . प्रेम असं नकळतच होत असतं म्हणा.. प्रेम झाल्यावर काय होतं ते बघा :

डोळ्यात साकळावा सारांश काळजाचा
प्रेमात वेळ नसतो बोलायला सविस्तर 

मास्तर लैच मुद्द्याचं बोलतात .

सतीश दराडे किलर कसे ठरतात ते त्यांच्या नजाकतीनं अन् भव्यतेनं भारलेल्या रचनांवरुन समजतं . आपण फक्त वाचायचं अन् प्रेमात पडायचं . आपल्या हातात दुसरा काही ऑप्शनच नसतो . फार फार बोलके शेर असतात मास्तरांचे . गझलेशी आपण संवाद साधू लागतो . ती कधी आपली मैत्रीण होऊन जाते कळत नाही . एक भोळी , भाबडी , अवखळ मैत्रीण ! मास्तरांच्या लिखानात जिवंतपणा आहे . ऊगाचच ओढून ताणून कैच्याकै फाफटपसारा ते मांडत नाहीत . जे काही मांडायचंय ते अगदी थेट आणि लैच समर्पक मांडतात ते . गझलेचा जन्मच मुळात प्रेमातून झालेलाय . परत या गझलेतून प्रेमाचा जन्म होतो . काळजाच्या जमिनीवर मास्तरांची गझल प्रेम पेरत जाते . हे सगळं आपोआप , नकळत , अलगद घडत असतं . मास्तरांच्याच भाषेत सांगायचं झालं तर असं म्हणता येईल :

जीव आंब्याची डहाळी होत जातो
काय गाते कोकिळा माहीत नाही

आपण असं आकंठ प्रेमात बुडालोय हे आपल्याही लक्षात येत नाही . मास्तर आपलं मन जिंकतात . प्रत्येक वेळी नवं काहीतरी पेश करतात . नाविन्य हा आणखी एक प्लस पॉइंटै सतीश दराडेंच्या गझलेचा . एकसुरीपणा किंवा तेचतेपण कुठंच जाणवत नाही . सतत काहीतरी वेगळं आणि हवंहवंसं गवसत राहतं . एखाद्या क्लासिक थ्रिलर चित्रपटात जशी प्रेक्षकांची ऊत्कंठा शिगेला पोचते तशी आपली अवस्था श्वासांच्या समिधा वाचताना होते . एकेक शेर आपण डोळ्यात प्राण आणून टिपत जातो . काही मिस होऊ नये , कुठं गल्लत होऊ नये... आपलं चित्त क्षणभरही विचलित होत नाही . आपण एकदम घट्ट जखडून राहतो . ही जखडण हवीहवीशी असते.. प्रेयसीच्या ऊबदार मिठीसारखी !
एक विशेष विषयांतर करतोय . थोडं आवश्यक आहे म्हणून . 

पोट फुटल्यासारखे आभाळ गळते
मारला कोणी विळा माहीत नाही

अशा शेरांशी आपण आपोआप एकरुप होऊन जातो . सतत गळणारं आभाळ इतक्या अप्रतिम रुपकात कुठं पहायला मिळेल का ? अशा काही शेरांवरुन मास्तरांची एक हळवी बाजू समोर येते . त्यांच्या शेरांमध्ये , गझलांमध्ये चकचकीतपणा , पॉलिश असलं काही निव्वळ दुर्मिळ ! त्यांची मातीशी जुळलेली नाळ अजूनही घट्टै . त्यांच्या गझलांमध्ये कित्येक ग्रामीण शब्द आणि संकल्पना येतात . त्यांची ही अदाकारी शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही गटातील रसिकांना भावते.

बघुन खोप्याचे गवत गायी म्हणाल्या
सुगरणींनो हे किती नुकसान आहे

याला म्हणत्यात अस्सल जाणीव ! सुगरणींच्या घरट्यांची तोंडभरुन तारीफ करणारे कवी , गझलकार आहेत . पण त्याच गोष्टीला जर एखाद्या गायीच्या नजरेतून पाहिलं तर ते तिच्या अन्नाचं - गवताचं नुकसान असतं ! अशी जब्राट भावना सुचणंच मुळात कठीण . अन् परत ती ईतक्या सफाईदारपणे मांडणं म्हणजे अफाटच ! दराडे गुर्जींची ग्रेटनेस अशाच अफाट रचनांमधून आपल्याला कळत जाते . साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींकडे ते फार वेगळ्या नजाकतीनं पाहतात . नजाकत हा किलर दराडेंच्या गझलेचा आत्मा आहे .

आज ती स्वप्नात आली वाटते
झोप माझी भाग्यशाली वाटते

का अचानक हृदय माझे थांबले
ती अता जाते म्हणाली वाटते 

क्या ब्बात है ! इथं काळीज आपोआप हलकं होऊन डोलू लागतं . प्रेमात आणि गझलेत नजाकतीशिवाय सगळंच अपुर्ण असतं . गझलेतली नजाकत पहायची , अनुभवायची असेल तर किलर दराडेंच्या गझलांशिवाय पर्याय नाही ! फार काही वेगळं किंवा जगाच्या बाहेरचं ते मांडत नाहीत . ते मांडतात रोजचीच दुःखे पण किलर अंदाजात...

यांची फुले करु , का ठिणग्या करु प्रिये
डोळ्यांत दोन अश्रू जमले तुझ्यामुळे 

याला म्हणतात प्रतिभा ! नाद खुळा ट्यालेंट ! किती कॉमन गोष्टीला कसं वलय प्राप्त झालंय इथं... दराडेंची गझल परीसै . त्यांचे साधे खयालही गझलेत आले की सोन्याचे वाटतात . प्युअर गोल्ड ! आपल्याला फक्त ती लय , तो मुड पकडता यायला पायजे . आपल्याही आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटेल ! सहज सोप्या गोष्टी तितक्याच सहज सोप्या पद्धतीत मांडल्या की त्या ग्रेट होतात . पण हे सहज सोपं मांडणं मात्र बिलकूल सोपं नसतं ! एक सच्चा संवेदनशील गझलकारच या सोप्या गोष्टी सहज करु शकतो ! किलर दराडे हे सगळं अगदी परिणामकारकपणे करतात ...

रानातले गवतही पायास लॉन वाटे
मी वाटतो मला का हल्ली अमीर मित्रा

या गोष्टीमुळंच सतीश मास्तर दिलावर राज़ करतात . ते आपला आपल्या जिवनाकडे बघण्याचा नजरियाच बदलून टाकतात . आपली जूनी दुःखे आता आपल्याला दुःखे वाटत नाहीत . दुःखांना आता गझलेचा सहवास लाभलेला असतो . एखाद्या कुरुप प्राण्याचं जादूनं राजपुत्रात रुपांतर व्हावं तशी आपली दुःखे आपल्याला देखणी भासू लागतात ! ही गझलेची जादू आहे.. ही किलर दराडेंची किमया आहे.. हे सगळं अफाट आहे.. भन्नाट आहे...

संपली देशातली सारी गरीबी
बातमी खोटी तरी भन्नाट आहे

गझल भन्नाटच असते . गझल सुंदरच असते . फक्त ती तितक्याच सुंदर नजरेनं टिपता यायला पायजे . किलर दराडेंचा हा गझलसंग्रह सुंदरतेनं काठोकाठ भरलेलाय . पण तुमची सुंदरतेची व्याख्या काय यावरही बरंचसं अवलंबून आहे . निव्वळच चकचकीतपणाला भुलणारे कदाचित त्या दिखाव्यालाच सुंदरता समजत असतील ! मास्तरांच्या गजलेत दिखावा हा प्रकारच आढळत नाही . जे काही असतं ते थेट काळजातून जशास तसं आलेलं असतं . म्हणूनच ते काळजाला भिडतं .

तिची धून ओठावरी सारखी
कन्हैय्या तुझ्या बासरी सारखी 

किती धास्तावले आहे बियाणे पेरणीपूर्वी
पुन्हा का सांगतो त्याला तुझ्या शेतीतले तोटे 

डोळ्यात थांबला आहे स्मरणांचा मेणा देवा
मज स्वागत करण्यासाठी अश्रू तर दे ना देवा 

एवढे जगण्यास आता खूप आहे
ती जिथे आहे तिथे सुखरुप आहे

आसवांनो जरा बरसणे थांबवा
दुःख पेरायला वापसा पाहिजे 

हा प्रवास खुप सरळ आहे . काळजापासून काळजापर्यंत ! ईतक्या अप्रतिम सादगीनं असे एक से बढकर कर शेर आपल्या काळजाचा ठाव घेत जातात . मी अगोदरच सांगितल्याप्रमाणं सतीश मास्तर प्रेमात पडायला आपल्याला जवळजवळ भाग पाडतात ! नाजूकता अन् तितकीच भावूकता अन् तितकीच गंभीरता अन् तितकीच सुंदरता... प्रेमात न पडणारा अंमळ हापम्याडच असेल ! मी हापम्याड अर्थातच नाहीये . श्वासांच्या समिधा वाचत वाचत मी फुलम्याड झालोय.. झिंगलोय.. अक्षरशः बेधुंद झालोय..

ही कोणती मदीरा तू पाजलीस प्रेमा
काया दशेत आहे आत्मा नशेत आहे

गझल ही प्रेमाची भाषा असते . आपले प्रेमाबद्दलचे ते शहारे आणणारे अनुभव हा गझलेचा हक्काचा विषय आहे ! किंबहुना त्याशिवाय गझल गझल वाटतंच नाही . गझल या शब्दाचा अर्थ प्रियकर आणि प्रेयसीमधील संवाद असा मी कुठंतरी वाचलेलाय . ( अन् मला तो पटलेलायपण . ) आता जेव्हा प्रियकर आपल्या प्रेयसीशी बोलत असेल तेव्हा तो देशाच्या आर्थिक परिस्थितीबद्दल थोडीच बोलणारै ? रुपयाचा भाव डॉलरच्या तुलनेत कसा आणि किती घसरतोय असं थोडीच विचारणारै ? त्यांची चर्चा कदाचित अशी असेल :

मी कुठे जन्मभर संगती मागतो
एकदा भेट हे का अती मागतो 

माझ्या तिच्या मिठीचा इतिहास काय सांगू
संकोच आड आला एकांत लाभल्यावर

ती मिठी , तो चंद्रमा , ती पौर्णिमा
काळ यावा मागचे क्षण घेउनी 

तुला जवळ घेता क्षणी मंद होतो
दिव्याला अता जाण आली असावी

नको अंग चोरु कवीतेपरी
जरा भेट कादंबरी सारखी

आपल्या मनातल्या या गोष्टी जेव्हा नेमकेपणानं आपल्या समोर येतात तेव्हा आपण किंचित लाजल्यागत होतो ! इतकं अस्सल लिखाण वाचलं की असं वाटतं कुणीतरी आपल्याच भावनांना शब्दरुप दिलंय.. गोड , नाजूक अन् प्रेमळ शब्दरुप ! या रोमांचित करणाऱ्या शेरांमुळं आपल्या मनाला लैच शाय शाय फिल होतं . जे मनात असतं तेच समोर आलेलं असतं . आपली लैच लाजरी तारांबळ उडते ! रसिकांच्या मनातलं लिहिणारे किलर दराडे अशाप्रकारे रसिकांच्या मनावर गारुड घालतात . पण ते फक्त रोगाबद्दलच बोलत नाहीत तर ते या प्रेमरोगाचा इलाजपण सांगतात . प्रेमभंगाचा कडवा डोस पचवायचा असेल तर सोबत दराडे मास्तरांचं गझलटॉनिक असणं लैच आवश्यक बनतं . प्रेमभंग पचवताना आपल्या स्वाभिमानी वृत्तीचंही ते दर्शन घडवतात .

सोडुनी जातेस पण लक्षात घे
जन्मभर जगशील दडपण घेउनी

हा प्रेमभंग याला नसतो इलाज दुसरा
शिंपून आसवांना जखमा बऱ्या कराव्या 

मला त्या कथेतील केलेस नायक
कथा जी कुठेही प्रकाशीत नाही 

कुणाला माहिती नसतिल तुझे माझे खरे किस्से
तरी अपुल्या घरोब्याचे उद्या होतील बोभाटे

या कलंदराकडे सगळ्याच कला आहेत . सगळेच बाण याच्या भात्यात आहेत . निर्णय आपण घ्यायचा असतो की आपण कुठल्या बाणानं घायाळ व्हायचंय ! सतीश दराडे गझलेला एका वेगळ्या ऊंचीवर नेऊन ठेवतात . समाजातील विदारक वास्तव अत्यंत समर्पक शब्दांत मांडताना त्यांची प्रतिभा सर्वोच्च पातळीवर असते .

नोकरीवाला कुणी मेल्यावरी
एक जागा रिक्त झाली वाटते

हा शेर वाचताच काळजात चर्र होतं ! आपल्या पापभिरु मनानं कितीही नाकारलं तरी हे वास्तव आहे .

दाखवाया शिस्त आटोकाट आहे
कायद्याला आतुनी पळवाट आहे 

ना सोयरे अखेरी ना यार शेवटी
देतात फक्त अश्रू आधार शेवटी 

तुजला सवाल करतो साधाच ब्रम्हचाऱ्या
स्वप्नामध्ये कितीदा चढलास बोहल्यावर

मास्तरांची वास्तव मांडण्याची ही पद्धत अफलातून आहे . मास्तरांची गझल भव्यतेनं भारलेली असते . त्यांच्या प्रतिभेची भव्यता त्यांच्या रचनांमधून बेशक दिसते .

झालो कसा विदेही गझले तुझ्यामुळे
देहाशिवाय जगणे जमले तुझ्यामुळे

भृंग मी हक्क माझा सुगंधावरी
मी फुलांना तरी संमती मागतो

मास्तरांचे अनेक शेर , अनेक गझला अक्षरशः वेडं करुन टाकतात ! प्रेम आणि गझल यांचं कॉकटेल म्हणजे किलर दराडे !
खरंतर आता थांबूच नये असं वाटतंय.. पण आता थांबावं लागेल ! चित्रपटाची खरी जादू चित्रपटगृहातच अनुभवली पाहिजे . ट्रेलर बघून अन् परीक्षणे वाचून चित्रपट कळत नसतोच . 'श्वासांच्या समिधा' हा नितांतसुंदर गझलसंग्रह अशाच पिक्चरसारखाये . त्याची खरी जादू तुम्ही स्वतःच अनुभवली पाहिजे . श्वासांच्या समिधांची द्वितीय आवृत्ती येत्या डिसेंबरमध्ये येतेय... किलर दराडेंची अदाकारी अशीच बहरत राहो , आम्हा रसिकांना असंच पुन्हा पुन्हा प्रेमाच्या पावसात भिजायला मिळो.. आता थांबतो ! दराडे मास्तर , आय लव यू...
___________________________________________________

महेन महाजन___दोन गझला




1.

माझा जगावयाचा साधाच बेत आहे
मरणाकडे परंतू आयुष्य नेत आहे

मातीत पेरलेले दाणे गहाण माझे
वादात वाटणीच्या कोर्टात शेत आहे

आजन्म तुडविलेरे ज्यांनी कळ्या फुलांना
त्यांनाच पुष्पगुच्छे सरकार देत आहे

आपापल्या ठिकाणी सारेच भ्रष्ट जंतू
आडून देत आहे चोरून घेत आहे

पैशाविणा इथे मी आहे जरी भिकारी
पोटातल्या भुकेला म्हणतो मजेत आहे

आहे मला भरोसा बदलेल विश्व सारे
वारा नव्या युगाचा वेगात येत आहे

2.


कृत्रिम पावसाचे झालेत फोल दावे
मातीत कोरड्या ह्या माझेच मी रुजावे

निष्पर्ण झाड मी पण यावा वसंत वाटे
आहेत श्वास तोवर मी मोहरून घ्यावे

ही चंद्रकोर माझी लाडात वाढलेली
पैशाविना हिला मी उपवर कसे करावे

डोळ्यात रोज कांदा त्यांच्याच का रडे हा?
वाटू नये कुणा की मालास भाव द्यावे

आहे महेन आता ही एवढीच इच्छा
गालात वेदनेने माझे हसू जपावे
_____________________________                        

सचिन क्षीरसागर___तीन गझला



1.

युगयुगांचा त्रास हा गेला टिपेला वाटतो 
विठ्ठलाचा भार आता या विटेला वाटतो 

पाहिली अोलावताना मी चितेची पापणी
आज बहुदा सद्गुणी माणूस मेला वाटतो

लटकतो खोपा कुठे हिरवा,कुठे भगवा,निळा
पाखरांनी आज जातीवाद केला वाटतो

वीज कडकडली मघाशी हुंदक्यागत वाटली
कंठ आभाळा तुझाही दाटलेला वाटतो

पोट गेलेले खपाटी अन् नजर व्याकूळली
जीवना तू जन्म जन्माचा भुकेला वाटतो

वावराचा बघ किती दिसतोय सुतकी चेहरा
पावसाचा काल बहुदा जीव गेला वाटतो

2.

ओसाड शेत बघुनी काळीज फाटलेले
डोळयात रे बळीच्या आभाळ दाटलेले

फसतात चेह-याला दिसते कुठे कुणाला
डोहात काळजाच्या हे दु:ख साठलेले

तारूण्य ह्या पिकांचे ते नासवून गेले
येथील पावसाळे होते पिसाटलेले

भेगाळली मनाची ही भिंत कैकवेळा
पाहूनिया कळ्यांना गर्भात छाटलेले

गळफास घेतल्यावर ते सांत्वनास आले
त्यांनीच काल होते अनुदान लाटलेले

3.

असा ठेव विश्वास तू ताकदीवर
जगाने झुकावे तुझ्या ठोकरीवर 

तुला विठ्ठला पूजले मी मनातुन 
तरी जीव गेला तुझ्या पायरीवर 

तुला काय मिळते पिकवतो जरी तू
नसे हक्क साधा तुझा भाकरीवर

सुखाने तिथे नांदती राम-अल्ला
नको व्यर्थ चर्चा करू बाबरीवर

सुखासोबती मांड दुःखासही तू 
उधळतिल फुले लोक मग शायरीवर

नको व्यर्थ अभिमान या जीवनाचा
असे जायचे शेवटी गोवरीवर
______________________________

विजय उतेकर___तीन गझला




1.

तुला सोडून येतानाच स्वप्ने जाळली होती
पुरावे नष्ट करण्याची शपथ मी पाळली होती

तुला ओलांडणे जमलेच नाही सांजवेळेला, 
तुझ्या त्या सावलीपाशी उन्हे रेंगाळली होती

तुझ्या नकळत तुला मी पाहतो हे चूक आहे तर
जरा आठव कितीदा ही नजर तू टाळली होती

किती मोघम किती लाडिक मला समजावले त्यांनी
म्हणे मी चालताना वाट ही ठेचाळली होती

उमललेल्या फुलाच्याही मुळाशी वेदनेचे घर
जरासा देठ खुडता पाकळी किंचाळली होती

तिचे फैलावणारे पंख जेथे छाटले होते
तिथे त्या उंबऱ्याची वेसही ओशाळली होती

दुरावा फारतर दोघांतले अंतर उघड करतो
जवळ होतो तरी मी अंतरे सांभाळली होती

2.

गुन्हा झाला,  सजा झाली, तरी डोळ्यावरी येतो
तुझा प्रत्येक ठसका माझिया नावावरी येतो

कसा होकार बहरासारखा अलवारही होतो
गुलाबी होत जातो अन् तुझ्या ओठावरी येतो

उधारी फेड आधीची पुढे मग बोलुया म्हणतो
तरीही रोज का मृत्यू उगा दारावरी येतो

तुझ्याशी गोड बोलावे अशी का आर्जवे त्याची
मुळातच तीळ म्हटले की तुझ्या गालावरी येतो

कुणाच्या मुग्ध श्वासांनी फुले ओशाळली होती
कुणाचा माग काढत गंध हा वाऱ्यावरी येतो

तसा अनयातही दिसतो जरासा कृष्ण राधेला
निळीशी वेदना होतो तरी भाळावरी येतो

3.

जन्मास ये पुन्हा तू, हासून बोहणी कर
शेवट नसेल हाती, सुरुवात देखणी कर

माझ्या मिठीतही तू केलेस राजकारण
झाली बरीच चर्चा, अंमलबजावणी कर

नसलाच चंद्र भाळी, कोरी कशास पाटी?
नशिबात चांदण्यांची हळुवार पेरणी कर

होळीत रंगला ना माझ्यासवे कधी तू
करशील जी दिवाळी अपुल्याच अंगणी कर

प्रत्येक वार होतो पाठीवरीच माझ्या
तू यार मोजताना मागून मोजणी कर

मी पाप पुण्य माझे, मोजून बैसलेलो 
चल थेट चित्रगुप्ता, नरकात नोंदणी कर 

इतिहास होत नसतो, खरडून पेन शाई 
इतिहास घडवण्या तू, देहास लेखणी कर 

आहे सुखात मी ही, नाही ददात काही 
झाल्या जुनाट गोष्टी; ताजी बतावणी कर 
____________________________________

धनंजय तांदळे___गझल




दिवस दिवस भर माझ्यासाठी  राबत होती माझी आई 
घेत कडेवर अनवाणी मज  चालत होती माझी आई 

कातळ रुतले रुतले काटे  वाटा झाल्या वैरी जेंव्हा 
माथ्यावरती सरपण काडी  वाहत होती माझी आई 

गार चुलीवर हात चटकता  सांग कसा गं ढेकर येतो 
अख्खी भाकर भरवुन मजला  फसवत होती माझी आई 

शीत गवसता पेव म्हणाली  दगडालाही देव म्हणाली 
दु:खालाही रंग सुखाचे  चढवत होती माझी आई

गीत माळता तुझ्या ऋणाचे  राहुन गेले बरेच काही 
असेच माझे जीवन सारे  रांधत होती माझी आई 
____________________________________________

केशव कुकडे ऊर्फ मुक्तविहारी___गझल



वेदनेचे गीत जेंव्हा गायचो मी
का तुझ्या दारात तेंव्हा यायचो मी

वादळे आली जरी देशात माझ्या
वादळांना अावराया जायचो मी

भीक आता मागण्याला कोण येतो  ?
रोज त्यांची भीक यारा खायचो मी

आज माझ्या आतली ही भावना जी
दाबली जाते तरी सोसायचो मी

तूच का गातोस गाणी वैभवाची
काल पावेतो तुला पोसायचो मी! 
_______________________________

संजय विटेकर___गझल



मोसमाचा मायना बदलून गेलो
मी बहर नसला तरी बहरुन गेलो

तू दिलेल्या कोरडया घावात पण मी
आसवांना फुलवणे शिकवून गेलो

भोगलेले क्षण पुन्हा यावे कशाला
कोणत्या घावास मग झेलून गेलो

तरसलो नाही भुकेसाठी कधी पण
भाकरीची आग का भोगून गेलो

ठेवले आदर्श सारे वळचणीला
माणसे दगडात मी कोरुन गेलो
_______________________


ऋषिकेश दीपक ढवळे___तीन गझला


1.

तेंव्हा जरा जरासा डोळ्यात चंद्र होता
दिसला टपोर जेंव्हा गगनात चंद्र होता

जिद्धीस ह्या कळेना मी नाव काय देऊ
बर्बाद जिंदगी अन् स्वप्नात चंद्र होता

पोटातल्या भुकेची होती कुठे अमावस
अर्धाच पण तरीही ताटात चंद्र होता

पाठीवरून फिरला अन् शांत वाटले गं
आई तुझ्या खरोखर हातात चंद्र होता

आतील सागराला आली कुठून भरती
बहुतेक काल रात्री डोळ्यात चंद्र होता

हलकेच वेदनांनाही लाभली झळाळी
जेंव्हा उजाडण्याच्या दुःखात चंद्र होता

ह्याच्यामुळेच माझी कविता दिगंत झाली
मी मांडला मनस्वी शब्दात चंद्र होता

2.

हप्त्यामध्येच सारे आयुष्य काढल्यावर
मी कर्जमुक्त झालो हे श्वास फेडल्यावर

माझ्यासमोर देवा नैवेद्य ठेवला तू
अश्रू पिऊन माझी मी भूक मारल्यावर

हल्ली मनाप्रमाणे ताणून झोप येते
स्वप्नांस आपुल्या मी डोळ्यांत गाडल्यावर

मीही मजेत आहे तीही सुखात आहे
सारे खुशाल झाले संबंध तोडल्यावर

आता कुठून पक्षी यावेत गीत गाण्या
ठेवू नको अपेक्षा तू झाड कापल्यावर

मंदीर पाहिले मी मस्जीद पाहिली मी
तो भेटला अखेरी आईस भेटल्यावर

3. 

त्याचे घरटे प्रचंड सुंदर फायदा काय ?
आयुष्यच त्याचे वा-यावर फायदा काय  ?

तहान लागुन तडफडून तो मेला अंती
समोर होता अथांग सागर फायदा काय 

कडू बोलण्यामध्येच ज्याची हयात गेली
त्याच्या रक्तामध्येच साखर फायदा काय 

एखाद्याला नाही लागत झोप सुखाची
त्याच्या पायापाशी चादर फायदा काय 

तुझिया दारासमोर बसतो अंध भिकारी
चराचरातुन तुझाच वावर फायदा काय
_________________________________

मनीष मालुसरे___तीन गझला


1.

दारात आसवांना बांधून बाप माझा
आहे बरीच दुःखे सोसून बाप माझा

आई मरून जाता...तो एकटाच रात्री
रडला ढसाढसा रे बरसून बाप माझा

भरवून लेकरांना,राहून तो उपाशी
झोपून शांत जाई हासून बाप माझा

घामात पावसाच्या शेती भिजून केली
माता जणू भुकेची मानून बाप माझा

बनला नदीवरीचा तो पूल एकतेचा
तुटकीच दोन गावे सांधून बाप माझा

अन्याय जाहल्यावर तो लालबुंद होतो
उठतो नव्या दमाने पेटून बाप माझा

तो जातपात नाही आता मुळीच मानत
झेंडा जुन्या रुढींचा जाळून बाप माझा

मुलगा तशीच मुलगी असती समान दोघे
दुनियेस हात सांगे जोडून बाप माझा

दे घास  तू भुकेल्या,पाणी तहानल्यांना
ही ज्ञान ज्योत आहे लावून बाप माझा

झिजवून श्वास त्याने...फुलवून बाग सारी
तिरडीवरून गेला हरवून बाप माझा

2.

सांगा कुठे कधी मी तितका तयार होतो
या बेगडी जगाचा जहरी नकार होतो

नाही मुळीच मजला भीती पराभवाची
खेळून जीवनाचा आलो जुगार होतो

पाहून शांत मजला ....आले जळून गेले
ठावे न दांभिकांना जळता निखार होतो

मी लावला तयांना त्या सापळ्यात माझ्या
माझ्याच प्राक्तनाचा झालो शिकार होतो

मी भाळलो रुपावर कळलेच सत्य नाही
ओठास ओठ भिडता झालोच ठार होतो

होती तहान मजला केव्हा तुझ्या सुखाची?
दुःखात आसवांना प्यालो चिकार होतो

तू घडवलीस ज्याने दुनिया समानतेची
त्या थोर लेखणीची बघ मीच धार होतो

थोडा प्रकाश देऊ...थोडा सुगंध वाटू
सुचला असा तुम्हाला तो मी विचार होतो

3.

शोधू नका कुणीही मज माणसात आता
मी नांदतो सुखाने वर तारकात आता

सारे दिवे कधीचे विझलेत सज्जनांचे
शोधी प्रकाश थोडा भयभीत रात आता

रानी मनी सुखाचे बहरून शेत येई
नाही असा दिलासा त्या पावसात आता

उच्छाद मांडलेला माझ्याच आसवांनी
केलेय बंद त्यांना मी काळजात आता

गर्दीतल्या सणांनी नेली लुटून अब्रू
झोपून देव गेला त्या उत्सवात आता

मी पेटतो असा की,मी घडवतो पिढ्यांना
बांधून वीज फिरतो मी पावलात आता
________________________________

जय विघ्ने___गझल



जरी वाहणारी सतत धार होतो
तरी अंतरी कोरडा फार होतो

रडाया न होते कुणीही स्मशानी
घराचा जरी मीच आधार होतो

बदलले किती डाव त्यांनीच खांदे
मलाही कळेना कसा भार होतो

तिचे वागणे भावले ना कुणाला
स्मशानी कसा काय शृंगार होतो

करावे तिनेही असे का बहाणे
कसा आज मी ही निराधार होतो

दिले मीच असते तुला श्वास माझे
खरे सांगतो मीच बेजार होतो

रडावे तिनेही जरासे स्मशानी
कसा का असेना तिचा यार होतो
_________________________________

अविनाश तेजराव घोंगटे___दोन गझला



1.

भारताच्या व्यथा काही साचल्या कागदोपत्री
एकतेच्या नद्या साऱ्या बाटल्या कागदोपत्री

श्वास चालून येथे बघ कोणता फायदा नाही
श्वास चालू असावा रे छापल्या कागदोपत्री

लोकशाही तळाला का जात आहे मला सांगा?
कायद्यांच्या नसा साऱ्या दाबल्या कागदोपत्री

आज देऊ किती कोणा भाषणांचे पुरावे मी
चक्क तोंडावरी चेष्टा चालल्या कागदोपत्री

फार मोठी दगाबाजी पूर्वजांशी अशी होते
जर खुणा सर्व सत्याच्या गाळल्या कागदोपत्री

येत नाही घरी पाणी,वीज नाही, नसे रस्ता
योजना ह्या लुटारुंच्या राबल्या कागदोपत्री

सोडले नाचणे मी ही दैवखेळावरी आता
हस्त रेखा तुझ्या देवा जाळल्या कागदोपत्री.

2.

काळास वाहणाऱ्या हा वाचतो अजिंठा
गतकाळ याद येता भारावतो अजिंठा

माझ्या मनात जागा आहेस तूच बुद्धा
मज खिन्नतेवरी का मग हासतो अजिंठा

पोटात कातळाच्या लावून ध्यान बसला
पाहा ऋषी प्रमाणे हा वागतो अजिंठा

घडल्यात वीर गाथा गर्वात सांगतो अन्
ऐकून प्रेमगाथा बघ लाजतो अजिंठा

मी अर्थ काय काढू निश्चिंत झोपण्याचे
तो एकट्यात उत्तर मज मागतो अजिंठा

डोंगर सजीव झाला डोळ्यात हासणाऱ्या
पाहून लक्ष मुद्रा वेडावतो अजिंठा

निर्वाण साक्ष देते तो बुद्ध आज नाही
त्या आठवात थरथर बघ कापतो अजिंठा
_____________________________________

श्रीकांत विजय चवरे___दोन गझला





1.

चला वेदनांची करू मोजणी 
चला यातनांची करू मोजणी 

तुझ्या आठवांच्यासवे स्फुंदल्या
अशा स्पंदनांची करू मोजणी 

ख-या कोणत्या आणि खोट्या किती
तुझ्या घोषनांची करू मोजणी 

किती मुक्तले कुंभमेळ्यातुनी ?
अशा पावनांची करू मोजणी 

अपू-याच माझ्या उरी राहिल्या ,
जुन्या भावनांची करू मोजणी

उरी वार केले कटाक्षातुनी, 
अशा लोचनांची करू मोजणी 

2.

भयाण  जीवन, भयाण वणवण
उदास हृदयी तुझी आठवण 

कफल्लकासम हिंडत असतो
उरात घेउन जखमांचे व्रण

उन्हाळ्यातहि भिजलेला मी
डोळ्यांमधला झेलुन श्रावण

तू नाही तर नाही काही
तहान नाही , नाही जेवण

या देहातुन, या श्वासातुन...
विरघळले हे तुझेच द्रावण
_________________________

बाळ पाटील____चार गझला



1.

कोणी कशात गेला , कोणी कशात गेला
येईल सौख्य दारी या भरवशात गेला

" जिंकीन या सुखाला " वदला कुणी शहाणा
परवा कळून आले, तोही अशात गेला

खाल्लेस जे नको ते त्याने अजीर्ण झाले
बेकार काळ वाया बघ उठबशात गेला

आहे धुवायचे तर खंगाळ या मनाला
पुरुषार्थ काय त्याचा जो कपबशात गेला

दिसते तशी न साधी ही रागिणी सुखाची
आलाप घेतला तो गवई घशात गेला

सूर्यास जोखण्याला वैशाख अनुभवावा
आजन्म पांगळ्यारे तू कवडशात गेला

2.

कुठे कृष्ण- राधा कुठे रास आता
तसाही फुलांना कुठे वास आता

विळ्याभोपळ्याने गळाभेट घ्यावी
असा राहिला का कुणी ' खास ' आता

मला पनवती अन तुला राहु- केतू
कुठे आपलीही जुळे रास आता

जरी माणसांना असे टाळले मी
भुतांचेच होती तरी भास आता

सदा घेत जा तू तपासून नाडी
मनाचा तनावर अविश्वास आता

भुकेलाच होता भुकेलाच आहे
असा 'देव' तोही इथे ' दास ' आता

3.

मागे जयजयकार चालला आहे
चौखांद्यावर स्वार चालला आहे

वाटेलाही लाज वाटली थोडी
या वाटे तो फार चालला आहे

आप्तानाही रान मोकळे झाले
कंठाने मल्हार चालला आहे

जाळ्यामधुनी मुक्त जाहला "तो ' ही
केवळ हा उपचार चालला आहे

होवो अथवा काकस्पर्श ना होवो
या पिंडातुन पार चालला आहे

भाळी त्याच्या भस्म रेखिले होते
सरणावर संस्कार चालला आहे

भिंतीचा आधार चालला आहे
ओट्यावरचा भार चालला आहे

4.

जगण्याचेही किती बहाणे करतो आपण
मेल्यावरती खरेखुरे ते मरतो आपण

खाण्यासाठीच हे जिणे की जगण्यासाठी
ठावी एकादशी तरीही धरतो आपण

सारे जागे, हमाल केवळ घोरत असतो
ओझे सारे मनावरी पांघरतो आपण

केले आम्ही महाग इथले दानापाणी
चंदर, मंगळ किती कुटाणे करतो आपण

झाल्या दुर्मिळ जिवाशिवाच्या गाठीभेटी
आंतरजालावरून का वावरतो आपण !

गेले सगळे रित्याच हाती जातानाही
येणार्‍यांची उगाच गोणी भरतो आपण
___________________________________

अरुण तिकटे___दोन गझला



1.

भावप्रीतीचा झरा तू
जीवनाचा आसरा तू

वेदना या दूर पळती
हासणारा चेहरा तू

तनमन तुझे...क्षणक्षण तुझे...
आठवांचा उंबरा तू

काळजात धडधडणारा
काळजाचा कोपरा तू

काय आता पाहिजे मज?
जीवन दिले ईश्वरा तू

2.

सोबतीला तुझे चालणे आवडे
बोलताना तुला ऐकणे आवडे

तू असावी पुढे वाटते पण खरे
नजर चोरूनही पाहणे आवडे

बहरते तू जशी...मोहरून फुलते
हाय मज हे तुझे लाजणे आवडे

आठवोनी तुझी लाघवी आठवण
काळजाला अता छेडणे आवडे
____________________________

जयदीप___तीन गझला

CA Jaydeep Joshi


1.

कित्येक घरांचे मोठेपण मोठेपण नसते
प्रत्येक घराच्या नशिबामध्ये अंगण नसते

काय तुला इथल्या वाटांची महती सांगू मी
दिसते जी साधारण ती ही साधारण नसते

दुनियेच्या दाराशी आल्यानंतर हे कळते
प्रत्येक घराच्या दारावरती तोरण नसते

पोस्टाने आले आहे लग्नाचे आमंत्रण
हे असले आमंत्रण काही आमंत्रण नसते

काय नवे कारण सांगावे ते समजत नाही
नाही म्हणण्यासाठी काहीही कारण नसते

2.

सापाचे अजगर करता येते
छान तुला सादर करता येते

काम तुला तर छानच हे जमते
'आता'चे नंतर करता येते !

एक रिकामी जागा आहे मन
अन् शंकेला घर करता येते

सगळी कामे जमली ना त्याला
शब्दांची साखर करता येते

कोणाला मालक बनता येते
पैशाला नोकर करता येते

गंध फुलांचा घेऊदे थोडा
घामाचे अत्तर करता येते

3.

पाहिजे तसे होणार आहे का
आपल्याकडे सरकार आहे का

का नजर सतत गर्दीकडे आहे
आपले कुणी दिसणार आहे का

पाहतो तिला चोरून मी आता
ती असा गुन्हा करणार आहे का

आपले स्वतःशीही पटत नाही
हे तुला कधी कळणार आहे का

मी तुला तसा सल्ला दिला असता
तेवढा मला अधिकार आहे का

तू युगे युगे असशील तेवत, पण
तेवढा इथे अंधार आहे का
________________________________